अकोले( प्रतिनिधी)-
अकोले तालुक्यातील एका धडपडणाऱ्या तरुण पत्रकाराने चित्रपट निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले आहे. त्याने निर्माण केलेला 'नवरदेव' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला. शेतकरी पुत्राच्या विवाह समस्या या समाजाला भेडसावणाऱ्या समस्येवर तसेच शेतकऱ्याच्या सुख दुःखाच्या प्रश्नावर हा चित्रपट आधारित आहे.
अकोले तालुक्यातील कोतुळचे भूमीपुत्र असलेले पत्रकार निरंजन देशमुख निर्मित, दिग्दर्शित, कथा पटकथा, प्रमुख भूमिका असलेला नवरदेव चित्रपट आज येथील अगस्ति चित्र मंदिरात प्रदर्शित झाला. हा चित्रपट पहाण्यासाठी आ.डॉ.किरण लहामटे,त्यांच्या सुविद्य पत्नी पुष्पा लहामटे यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अकोलेकरांनी उपस्थिती दाखवून या सामाजिक आशयाच्या चित्रपटाचे कौतुक केले.
या चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मान्यवरांच्या हस्ते चित्रपटाचा उदघाटन समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.के.स्टुडिओ,पुणेचे संचालक मच्छीन्द्र धुमाळ होते. यावेळी सिने अभिनेते रवींद्र नवले, एम.के धुमाळ,राजन शिंदे यांना सांस्कृतिक क्षेत्रातील कला गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.
निरंजन देशमुख यांनी आपल्या चित्रपट निर्मिती मधील संघर्षामय प्रवास सांगताना त्यांचेसह उपस्थित मान्यवर प्रेक्षक भावुक झाले होते.
या चित्रपटात अभिनेते रवींद्र नवले, पांडू कोळपकर, स्वप्नील कांडेकर, डॉ.रमा कुलकर्णी, सौ. ज्योती गायकर, निता आवारी, सचिन शिंदे, माधवराव तिटमे, ॲड भाऊसाहेब नवले, रेवणनाथ देशमुख, अमोल आरोटे, मुन्ना शेख, जादुगार पी बी हांडे, जंगम सर, कुमारी गायत्री पांडे, स्व. संदीप रसाळ आदीसह स्थानिक कलावंतांनी भूमिका साकार आहे.
चित्रपट पाहील्या नंतर आ.डॉ.किरण लहामटे यांनी शासनाकडून या चित्रपटासाठी आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, पत्रकार निरंजन देशमुख यांच्या धडाडीचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.सर्वांनी कुटुंबीयांसह हा चित्रपट पहावे असे आवाहन आ.डॉ.किरण लहामटे यांनी केले.
अखेर शेतकऱ्याचा मुलगा नवरदेव झाला.... नवरदेव चित्रपट अकोले अगस्ती थिएटर मध्ये चालू आहे. एक वेळेस सर्वांनी अवश्य पहावा असा चित्रपट आहे.शेतकरी व शेतकऱ्यांच्या मुलाची आजच्या युगाची खरी वस्तुस्थिती या चित्रपटांमध्ये आहे. चित्रपटाचा शेवट नोकरीवाल्यापेक्षा शेतकरीच योग्य नवरदेव आहे हा संपूर्ण चित्रपट पाहिल्यानंतर कळेल. पहिल्याच दिवशी थेटर हाऊसफुल झाले होते .
९ जानेवारी २०२५ रोजी " नवरदेव " या चित्रपटाचा प्रीमियर शो अगस्ती चित्र मंदिर अकोले येथे पहावयास मिळाला. नवरदेव हा चित्रपट मनाला अतिशय भावला. चित्रपटातील गाणी त्याचे संगीत अतिशय सुमधुर आहे, चित्रपटाची कथानक खूप चांगले आहे ,खरं तर प्रत्येक तरुण मुला-मुलींनी हा चित्रपट नक्की पहावा. नोकरदार मुलींना नोकरी करणारच नवरदेव हवा असतो तसेच आज-काल प्रत्येक शेतकरी मुलीलाही आणि त्यांच्या बापालाही नोकरी करणाराच नवरदेव हवा असतो. त्यामुळे अपेक्षा वाढलेला शेतकरी बाप कसा फसतो, याविषयी चित्रपटात अतिशय सुंदर चित्रीकरण केलेले आहे. चित्रपटातील कलाकार आणि त्यांचा अभिनय, काही कलाकार नवखे असले तरी तसे वाटत नाही. चित्रपटात असे अनेक प्रसंग आहेत की, जिथे तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही. कारण चित्रपट पाहताना आपण त्या भावनांशी जुळले जातो आणि त्यामुळे आपोआपच डोळे पाणवतात.
याचबरोबर शेतकरी आणि शेतीमाल , यांना समाजात कशी कवडीमोल किंमत आहे, याची अतिशय सुंदर सांगड या चित्रपटात घातलेली आहे. शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा, नोकरदार, कष्टकरी, आणि उच्चभ्रू सर्वांचाच अन्नदाता मात्र त्याच्या कष्टाला मोल नाही, त्याच्या शेतीला भाव नाही त्यामुळे शहरी बाबू पेक्षा कमी पैशात जगण्याची सवय असलेला शेतकरी बाजारात कसा नागावला जातो याची अतिशय सुंदर चित्रीकरण या चित्रपटात दाखवले आहे.
केवळ शेतकरी असलेल्या २५ वयावरील मुलामुलींनीच हा चित्रपट पहावा असे नाही समाजातील सर्व घटकांमधून सहकुटुंब , सहपरिवार, हा चित्रपट नक्की पहावा असाच आहे. चित्रपट भावनिक आहे अश्लीलतेचा थोडासाही अंश या चित्रपटात नाही, म्हणूनच मला असे वाटते की हा चित्रपट केवळ अकोले, अहिल्यानगर पुरता मर्यादित नसून अखंड महाराष्ट्रात चित्रपटास चांगला प्रतिसाद मिळेल हीच अगस्ती चरणी प्रार्थना. दत्ता शेणकर प्रेक्षक यांनी व्यक्त केले.
कोट :- चित्रपट निर्माते व मुख्य भूमिका असणारे निरंजन देशमुख हे पत्रकार असून हेमंत आवारी, रमेश खरबस, भाऊसाहेब वाकचौरे, सचिन खरात, प्रशांत देशमुख हे पत्रकार पण भूमिकेत आहेत.