श्रीरामपूर / प्रतिनिधी:
युवा अवस्थेत युवकांनी व युवतींनी आपल्या यशाचे तेज कायम वाढते ठेवले पाहिजे. समाजसेवेची सुरुवात करताना ती आपल्यापासून करावी, मात्र आपण आपल्यासाठी नाही, तर गावासाठी झटून खऱ्या अर्थाने सामाजिक विकास साध्य होईल असे प्रतिपादन उंबरगावच्या सरपंच ऍड. सुप्रियाताई भोसले यांनी केले.
श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या उंबरगांव येथील विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त भरत साळुंके हे होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे विश्वस्त नंदूशेठ खटोड, , महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रा. हंबीरराव नाईक,अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक विराज भोसले, संचालक सचिन काळे, उंबरगाव विकास सोसायटीचे चेअरमन रवींद्र झरेकर, राजेंद्र ओहोळ,ग्रामस्थ दादा पाटील काळे, बाळासाहेब राऊत, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत कोतकर, प्रा. अशोक थोरात, प्रा. डॉ. संजय नवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. हंबीरराव नाईक मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपलं गाव हेच आपलं राष्ट्र समजून युवकांनी कार्य केले पाहिजे. तर राजेंद्र ओहोळ म्हणाले की, तुम्ही जिथे जाताल तिथे आपल्या कार्याचा ठसा उमटविला पाहिजे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेतून आदर्श युवक घडावेत. समाजासमोर उभ्या असलेल्या ज्वलंत प्रश्नांची जाण त्यांना असावी तरच राष्ट्राचा विकास घडवून येतो.
कार्यक्रमाची सुरुवात सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षीय सूचना प्रा. डॉ. संजय नवाळे यांनी मांडली, तर प्रा. अशोक थोरात यांनी अनुमोदन दिले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत कोतकर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.अशोक माने यांनी केले, तर आभार प्रा. डॉ. बाबासाहेब पवार यांनी मानले. सदर कार्यक्रमास उंबरगाव ग्रामस्थ, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेतर सेवकवृंद, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या समस्त पदाधिकाऱ्यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
*वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111