shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ही विजयश्री अविस्मरणीय, महाराष्ट्राला आपला अभिमान’ - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


*खो खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरणाऱ्या महिला, पुरूष संघांचे अभिनंदन

*कर्णधार प्रियंका इंगळे, प्रतिक वाईकर यांचे विशेष कौतुक

मुंबई / प्रतिनिधी:
ही विजयश्री अविस्मरणीय आहे. या कामगिरीसाठी महाराष्ट्राला आपला अभिमान आहे,' अशा शब्दांत खो खो च्या पहिल्या विश्वचषकावर भारताचे नाव कोरून ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला आणि पुरूष संघांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे.


या दोन्ही संघांचे कर्णधारपद महाराष्ट्राकडे असताना हा अविस्मरणीय विजय साकारला गेल्याचा विशेष आनंद व्यक्त करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महिलासंघाची कर्णधार प्रियंका इंगळे, पुरूष संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर यांनी महाराष्ट्राची मान गौरवाने उंचावण्याची अद्वितीय कामगिरी केल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.

"पहिल्याच विश्वचषकावर भारताचे नाव कोरण्याची कामगिरी आपल्या महाराष्ट्र सुपुत्रांनी केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी विश्वविजेत्या महिलासंघाची कर्णधार प्रियांका इंगळे हिच्यासह संघातील खेळाडू अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, वैष्णवी पवार तसेच पुरुष संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह सुयश गरगटे, अनिकेत पोटे, आदित्य गनपुले व रामजी कश्यप या खेळाडूंचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे.

या विजयात पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले, महिला संघाच्या प्रशिक्षक प्राचीताई वाईकर आणि फिजिओथेरेपिस्ट डॉ. अमित रावहाटे यांच्या मार्गदर्शनाचा मोठा वाटा आहे. या सगळ्यांनी आपल्या सांघिक कामगिरीने देशासाठी अविस्मरणीय विजयश्री खेचून आणली आहे. या यशात खेळाडच्या मेहनतीसह, त्यांच्या कुटुंबियांचे पाठबळ महत्वपूर्ण आहे. या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि खेळाडूंच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी संदेशात म्हटले आहे.
*वृत्त विशेष सहयोग
मुख्यमंत्री सचिवालय ( जनसंपर्क कक्ष)
*वृत्त प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
close