कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत मंत्री विखे पाटील यांच्याकडे केली मागणी
शहरासाठी लागणारे अतिरिक्त आवर्तनाकडेही मंत्री महोदयांचे वेधले लक्ष
श्रीरामपूर / प्रतिनिधी:
रब्बी साठी एक आवर्तन आणि उन्हाळी हंगामाचे तीन आवर्तनाची मागणी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
भंडारदरा प्रकल्प (प्रवरा कालवे) रब्बी व उन्हाळी हंगाम सन २०२४ - २५ च्या नियोजनाबाबत कालवा सल्लागार समितीची बैठकीचे आयोजन इरिगेशन बंगला, लोणी या ठिकाणी करण्यात आले होते. त्याप्रसंगी आमदार हेमंत ओगले यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे आवर्तनाबाबत निवेदन देऊन मागणी केली आहे.
सध्या भंडारदरा व निळवंडे धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असून मुबलक प्रमाणात पाणीसाठा देखील आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेने केंद्रशासन पुरस्कृत सुधारित पाणीपुरवठा योजना अमृत २.० चे काम हाती घेतले आहे. त्यामुळे शहरातील दोन तलावांपैकी मातीच्या साठवण तलावाचे विस्तारीकरणाचे काम चालू झालेले आहे त्यामुळे एका साठवण तलावाच्या आधारे शहराची दैनंदिन पाणीपुरवठ्याची गरज भागविणे आवश्यक असल्याने शेतीच्या आवर्तना व्यतिरिक्त खास बाब म्हणून आवर्तन सोडताना प्रवाह बंद कालावधी हा पंधरा दिवसापेक्षा जास्त नसावा जेणेकरून शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणे सोयीचे होईल अशी मागणी आमदार ओगले यांनी केली आहे.
आवर्तन सुरू असतानाच गाव तळे व प्रवरा नदीवरील केटी बंधारे भरून मिळावे ज्यामुळे शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न मार्गी लागणार असल्याचे आमदार हेमंत ओगले यांनी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर उपस्थित होते.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111