नांदेड जिल्ह्यातील दोन आत्महत्येच्या बातमीने खूप उदासी आलीय.
कर्जबाजारीपणा तसेच सततच्या नापिकीमुळे आर्थिक संकटात अडकलेल्या मिनकी येथील शेतकरी पिता-पुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केली. मोबाईल घेवून दिला नाही म्हणून मुलाने आत्महत्या केली व नंतर त्याच ठिकाणी वडिलांनी आत्महत्या केली अशी बातमी झाली व मोबाईलमुळे मुले किती उतावीळ झालीत अशी मध्यमवर्गीय पद्धतीने चर्चा झाली पण वस्तुस्थिती त्यापेक्षा अधिक खोल आहे.
अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र पैलवार यांना दोन एकर जमीन. चार लाख ५० हजारांचे कर्ज ,आणखी खाजगी कर्ज आणि उसनवारी ..सततची होत असलेली नापिकी, उदगीर येथे शिक्षणास असलेला
मुलगा ओमकार हा संक्रांतीनिमित्त गावाकडे आला. वडिलांना नवीन कपडे व शालेय साहित्य तसेच नवीन मोबाईल मागितला परंतु वडिलांनी त्याला थोडे दिवस थांब, नंतर घेऊन देतो, असे सांगितले. तो दोन दिवस सतत मागत होता.वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून त्याने रात्रीच्या वेळेस त्यांच्या शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.वडील सकाळी शोधाशोध करत शेताकडे गेले तेव्हा शेतातील लिंबाच्या झाडाला मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बघितले. ते पाहताच वडिलांनीसुद्धा मुलाने गळफास घेतलेला दोरखंड सोडून त्याच दोरखंडाने, त्याच झाडाला गळफास घेतला..वडील व मुलगा एकाच झाडाला, एकाच
दोराने गळफास घेवून गेले....
मोबाईल साठी मुले किती आतताई झाली आहेत इतके सोपे अर्थ काढून सुटका करून घेता येणार नाही...मुलगा कपडे वह्या पुस्तके आणि अभ्यासासाठी मोबाईल मागत होता..अनेकांना वाटेल सगळे मिळून ४ ते ५ हजार फार तर लागले असते पण कर्जबाजारी असलेला बाप गावात नातेवाईकात अनेक प्रकारची उसनवारी केल्यावर इतक्या छोट्या गावात पुन्हा कोणाकडे पैसे उसने मागणार होता ?अगोदर उसने घेतलेल्या माणसाला कोण पुन्हा पैसे देईल ? शेतात असलेली तूर विकून मग तुला पैसे देतो इतकी अगतिकता बापाची होती...
मुलगा मुलाच्या जागी बरोबर होता. दुसऱ्या जिल्ह्यात शिकायला असताना शाळेत सतत लागणारे साहित्य त्याच्याकडे नाही, धड कपडे नाहीत. या वयात एक आत्मसन्मानाची भावना तीव्र असताना हा कमीपणा सतत अवमानित करत असणार...इतर मुलांशी तुलना होत असणार...मोबाईल ही इतर मुलांचे बघून गरज वाटत असणार...शहरात राहणाऱ्या मुलाला किमान वस्तू असाव्यात हे वाटण्यात गैर काय ?
आणि दुसरीकडे बापाचं मन त्या मागणीने विदीर्ण होत असेल. अपराधी भावनेने भरून जात असेल..दुसऱ्या जिल्ह्यात लेकराला मोठ्या अपेक्षेने शिकायला ठेवले.आपण शिकलो नाही किमान मुले तरी शिकून या दृष्टचक्रातून बाहेर पडावी यासाठी शहरात शिकायला पाठवले पण त्या मुलाची
किमान गरजा ही आपण पूर्ण करू शकत नाही...त्या प्रत्येक वेळी मुलाच्या रडण्याने त्याने मनातल्या मनात अनेकदा आत्महत्या केली असेल..आणि प्रत्यक्ष जेव्हा त्याने शेतातल्या झाडाला मुलाचा लटकलेला मृतदेह बघितला त्याक्षणी त्याला मेल्यावरून मेल्यासारखे झाले आणि अपराधी वाटण्याची कमाल मर्यादा ओलांडली... अरे, आपल्या लेकराला साधे कपडे पुस्तके आणि मोबाईल साठी मरावे लागत असेल तर जगण्यात काही अर्थ नाही..अशीच भावना त्या बापाची झाली असेल...आणि त्यानेही आत्महत्या केली...
यानिमित्ताने
शेतकरी आत्महत्येची टिंगल करणाऱ्यांनी ही एकच आत्महत्या अभ्यासावी म्हणजे शेतकरी कुटुंब कोणत्या ताणातून जात असते हे समजेल...बायकोशी भांडण झाले म्हणून शेतकरी आत्महत्या करतो आणि त्याला लोक शेतकरी आत्महत्या म्हणतात अशी खिल्ली अनेकजण उडवतात..या आत्महत्येला ही मोबाईलसाठीची आत्महत्या म्हटले जाईल...मागे एकदा बीड जिल्ह्यात १५ ऑगस्टला पोरगं गणवेश मागत होते. बाप घेऊ शकला नाही आणि रडणारे पोरगं बघू शकता नाही म्हणून बापाने आत्महत्या केली..तेव्हा इतके क्षुल्लक कारण आत्महत्येला असते का ? असे प्रश्न काहीजणांनी विचारले होते...तोच तर खरा मुद्दा आहे. इतकी छोटी गोष्ट ही आपण आपल्या लेकराला देऊ शकत नाही..बायकोला धड साडी घेवू शकत नाही..यातून अगोदरच स्वत:च्या मनातून उतरलेल्या स्वत:ची आत्मप्रतिमा मलिन झालेला तो अधिकच व्याकूळ होतो व जगणेच निरर्थक वाटू लागते...ही अगतिकता समजावून घ्यायला हवी...अगदी दारू पिऊन आत्महत्या जरी केली तरी त्या तीव्र नैराश्यातून व्यसन आलेले असते व त्यातून आत्मप्रतिमा
अधिकच ढासळते हे लक्षात घ्यायला हवे...एक शेतकरी म्हणाला होता की सण येऊच नये असे वाटते कारण इतर दिवस कसेही निघून जातात पण सणाच्या दिवशी गोडधोड करता येत नाही,नवे कपडे घेता येत नाही..यातून अधिक अपराधी वाटत राहते...शेतकऱ्याचे हे भावविश्व आपण समजू तरी शकतो का...?
दुर्दैवाने शेतकरी आत्महत्येचा प्रश्नच आजच्या मनोरंजन प्रधान समाजातून दूर ढकलला गेला आहे.. राजकारणातील व्यक्तींचे संघर्ष याभोवती माध्यमे फिरत आहेत. समाज माध्यमे मनोरंजन व्यक्तिवाद प्रधान झाली आहेत आणि सुखासीन झालेल्या उच्च मध्यमावर्गाकडे रोल मॉडेल बघत मध्यमवर्ग मार्गक्रमण करत आहे. अशा एकट्या पडलेल्या शेतकऱ्यांना आधार द्यायला शेतकरी संघटना उरल्या नाहीत आणि शासन आत्महत्या अपात्र ठरवून इतर कारणाने त्या आत्महत्या झाल्याचे दाखवत शेतकरी आत्महत्या संख्या कमी करण्याचे आकड्यांचे खेळ करण्यात मग्न आहे. त्यामुळे आर्थिक मदत देण्याचा
प्रश्नच उद्भवत नाही..अशा कोंडीत शेतकरी जगणे आणि मरणे सापडले आहे...या दोन्ही आत्महत्या घरगुती वादातून झाल्या असे पांघरून त्यावर घातले जाईल.
एकीकडे करोडो रुपये खर्च करून होणारी लग्न, विमानतळावर होणारी गर्दी, ओसंडून वाहणारे मॉल्स,
करोडो रुपयांचे महामार्ग बांधकाम, मेट्रो, आय टी क्षेत्राची वाढ आणि दुसरीकडे त्याच तंत्रज्ञानाचा मोबाईल मिळत नाही म्हणून एकाच दोरीला लटकणारे बाप आणि लेक...
या आत्महत्या कशा समजून घ्यायच्या...?
बरोबर २० वर्षापूर्वी अकोला जिल्ह्यातील आकोट तालुक्यात १० वीत शिकणाऱ्या दिपाली कोल्हे नावाच्या मुलीने वडिलांचे शेतीतील कर्जबाजारी दुःख बघवत नाही , नीट शिकता येणार नाही आणि मोठ्या बहिणींचे लग्न होऊ शकत नाही म्हणून तिने आत्महत्या केली होती... विशेष म्हणजे तिला शेतकरी आत्महत्या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत बक्षीस मिळाले होते..
दिपाली आणि ओमकार दोघेही दुर्दैवी शेतकरी कुटुंबात जन्मलेले विद्यार्थी...दोघेही शेतकरी वेदनेतून बाहेर पडण्यासाठी शिक्षणाचे साधन घेवून त्या दुष्ट चक्रातून बाहेर पडण्यासाठी वेगळी स्वप्न बघतात पण शेतीच्या गळ फासात ते अडकतात....पुढची पिढीही पुन्हा त्याच दुर्दैवात ओढली जाते आहे...
अशावेळी खचून जायला होते..
ओमकराचे वडील ४३ वर्षांचे होते..तरुण आई उरलेली दोन लेकरे आणि दोन एकर जमीन घेऊन आता काय करील..? दोन जीव गेलेल्या त्या शेतात ती जाऊ तरी शकेल का ?
एकीकडे चकचकीत इंडिया , चढता सेन्सेक्स, विश्वगुरू व्हायला निघालेला देश आणि दुसरीकडे रोज दुःखाचे नवीन सरण रचणाऱ्या या अगणित कहाण्या..एकीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधनाचे शेतीवर परिणाम शोधणारे लोक आणि एकाच शेतात एकाच झाडाला एकाच दोरीला लटकणारे बाप लेक....
या व्यवस्थेत फक्त आपण वेदना व्यक्त केली इतके समाधान फक्त मिळते...बाकी संपणारे वर्ष नव्या वर्षाला मागच्या आत्महत्येची संख्या मागील पानावरून पुढे सुपूर्द करत राहतोच आहे....
*हेरंब कुलकर्णी*
herambkulkarni1 971@gmail.com