shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

क्षितिजा पलिकडील स्वप्नांचा, एक संघर्षमय प्रवास..!

     चित्रपटसृष्टीत हिरो व्हायचंय असं ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाईचं स्वप्न असतं.
परंतु प्रत्येकाचे स्वप्न साकारचं होईल असं नाही. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा सारख्या ग्रामीण भागातील राजेश मच्छिंद्र ननवरे या तरुणानं जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा अन मेहनतीच्या जोरावर, अनंत अडचणीवर मात करीत चित्रपट सृष्टीच्या चंदेरी दुनियेत छोट्या-मोठ्या भूमिका निभावत त्याने अखेर "ठाकराचा तुक्या" व "प्रेमवारी" या मराठी चित्रपटाचा नायक होण्याचे स्वप्न साकार केलं आहे.
     



त्याचा "ठाकराचा तुक्या" हा मराठी चित्रपट २०१५ मध्ये व "प्रेमवारी" हा चित्रपट २०१९ मध्ये प्रदर्शित झाला.या चित्रपटाच्या प्रिमियर शो नंतर राजेश ननवरे या तरुणाचा सर्वसामान्य महाविद्यालयीन युवक ते एका मराठी चित्रपटाचा नायक असा एक दशकाचा "संघर्षमय प्रवास" जाणुन घेतला. पहिलवान मच्छिंद्र दगडू ननवरे यांचा मुलगा राजेश ननवरे लहानपणापासून व्यायाम करण्याची आवड,कुस्ती,पोहणे,लांब उडी - उंच उडी,भाला फेक,गोळा फेक, कब्बडी, कराटे, प्रत्येक खेळा मध्ये सहभाग घेत त्याने प्राविण्य मिळविले.
गावातीलच स्थानिक भैरवनाथ विद्यालयात त्याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. तर कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले. महाविद्यालयीन आयुष्यात वार्षिक स्नेहसंमेलनानिमित "पुन्हा यदा कदाचित" या विनोदी नाटकामध्ये काम करण्याची पहिली संधी त्याला मिळाली. त्याने या संधीचे सोने करत   उपस्थित रसिकांची  कौतुकाची थाप मिळविली. 
आणि तिथूनच अभिनयाची खरी सुरुवात झाली.

त्यानंतर त्याने चित्रपटात भूमिका मिळवण्यासाठी पुणे, मुंबई अशा शहरात चकरा मारायला सुरुवात केली. अभिनयासाठी त्याने पथनाट्यापासून,नाटक, लघुपट, अशा विविध माध्यमातून अभिनय करायला सुरुवात केली ."दूरदर्शन" वरील "आनंद-महिमा" या मालिकेतील दहा भागा मध्ये तो प्रेक्षकांना दिसला.
      
त्यानंतर राजेश ला मोठया पडद्यावरही अभिनय करण्याची संधी मिळाली. "महिमा खंडोबाचा" हा राजेश ननवरे यांचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट. त्यामध्ये त्यांनी (सुरक्षा रक्षकाची)भूमिका निभावली.
       त्यानंतर "बोडक्याचा बाजीराव"(पत्रकार) "ट्रॅफिक जाम"(इन्स्पेक्टर) "ब्रह्मांडनायक"(सिरपा) "सद्गुरू" (शेतकरी) "टर्री"(पंटर) "रौंदळ" (काटामन) "डिलिव्हरी बॉय" (शिरपा) आदि चित्रपटांत त्यांनी छोट्या-मोठया,पण विविध प्रकारच्या भूमिका साकार केल्या आहेत.
      
दहा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर यापुढे त्याने चित्रपटात मुख्य भूमिका करण्याच्या निर्धार केला. 
पुढे पुण्यातील जुन्नरचे निर्माते-दिग्दर्शक प्रा जगन्नाथ खंडवे हे ठाकर समाजावर आधारीत 'ठाकराचा तुक्या" या मराठी चित्रपटाची जुळवा जुळव करीत होते. या चित्रपटातील भूमिकेसाठी आवश्य असणारा नायक त्यांना हवा होता. सावळा वर्ण, साडेपाच,पावणेसहा उंची, भेदक नजर आणि व्यायामाने कमावलेली शरीरयष्टी.
 कराटे मध्ये ब्लॅक बेल्ट मिळवलेल्या राजेश ननवरेला त्यांनी हेरलं आणि- "ठाकराचा तुक्या" या चित्रपटाचा नायक त्यांना गवसला. राजेशने ठाकरचा तुक्या या मराठी चित्रपटात रवींद्र नामक पोलीस इन्स्पेक्टरची मुख्य भूमिका साकारली आहे.
    
या दहा वर्षाच्या कालखंडात संघर्षाचे अनेक अनुभव त्याच्या पाठीशी आहेत. तो आता मराठी चित्रपटात स्थिर झाला आहे. 
मात्र या मागे त्याची जी मेहनत व सातत्याने करीत असलेल्या कार्यात त्याला यश मिळत आहे.

 कौटुंबिक परिस्थिती अतिशय बेताची असल्याने शेणाने सारवलेल्या छोट्या घरात त्याचे बालपण गेले. यातच त्याने चित्रपट सृष्टीत पदार्पण करणे तसं सोपं नव्हतं. 
मात्र इच्छाशक्तीच्या जोरावर मिळवलेल्या अनेक प्रेरणादायी मराठी चित्रपट सृष्टीचा आपण एक छोटासा घटक असल्याचा त्याला सार्थ अभिमान आहे. लहानपणापासून आई- वडिलांचे प्रोत्साहन आणि आयुष्याच्या जडणघडणीत मोठाभाऊ विनोद ननवरे यांनी दिलेली खंबीर साथ राजेशला बहू मोलाची वाटते. 
याच जोरावरच त्याचा चित्रपट सृष्टीचा प्रवास अविरतपणे जोमाने सुरु आहे.
      
भविष्यात तो मराठी चित्रपटातील एक नामवंत कलाकार म्हणून पुढे येईल यात शंकाच नाही..!
असे त्याच्या "ठाकराचा तुक्या" व "प्रेमवारी" या चित्रपटातील अभिनयावरून दिसते.
       
राजेशने ग्रामीण भागात शिक्षण घेत असताना अत्यंत खडतर अडचणीनवर मात करीत आपल्यातील कलाकार जिवंत ठेवला आहे. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व मेहनतीच्या जोरावर फक्त जीवाची मुंबई करण्यासाठी मुंबईला न जाता आपल्याला कलावंत व्हायचंय, माय बापाचं, गावकऱ्यांचं व आपलं स्वप्न साकार करायचंय या ध्येयाने प्रेरीत होऊन त्याने छोट्या-मोठया भूमिका कोणत्याही गॉडफादरशिवाय व मार्गदर्शनाशिवाय मिळविल्या आहेत म्हणूनच आज तो मेहनतीच्या बळावर चित्रपट सृष्टीत स्थिरावला आहे.
      
मोहमायी मायावी चित्रपट नगरीच्या दुनियेत उच्चस्थान गाठून देखील  राजेशचे पाय जमिनीवरच आहेत.
 स्वतःचे नाव मोठे झाले तरी राजेश आपल्या मातीतल्या माणसांना विसरलेला दिसत नाही.
आताही राजेश गावात आल्यानंतर आपल्या माणसांसोबत पारावर गप्पा करतो त्यांच्यासोबत वेळ घालवतो तर कधी गावातील टपरीवर चहा पिताना दिसतो.
 महाराष्ट्र राज्यातील व राज्याबाहेर अनेक  तरुणांना व्याख्यानाच्या, कीर्तनाच्या, चित्रपट अभिनयाच्या माध्यमातून समाज हिताचे धडे देण्याचे कार्य राजेश करतो आहे.
 याच कारणे राजेश थोरा मोठ्यांचा आशीर्वादाने प्रगतीचा उच्चांक  गाठत आहे.

     शब्दांकन:- रमेश जेठे(सर)
close