भारतीय संघाची सातत्याने घसरत चाललेली कामगिरी लक्षात घेऊन भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी आढावा बैठक बोलावली होती. यादरम्यान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी भारतीय खेळाडूंवर अनुशासनहीनतेचा आरोप केला. नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाला १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. याआधी त्यांना न्युझिलंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतही पराभव पत्करावा लागला होता.
वृत्तसंस्था एएनआयने बीसीसी- आयशी संबंधित एका सूत्राच्या हवाल्याने सांगितले की, या बैठकीत मुख्य प्रशिक्षक गंभीरने अनुशासनाचा मुद्दा उपस्थित केला. ड्रेसिंग रूममधून लीक झालेल्या संभाषणाचा संदर्भ गंभीरने दिल्याचे मानले जात आहे. खरे तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीतील पराभवानंतर गंभीरने ड्रेसिंग रूममध्ये भारतीय खेळाडूंना फटकारले होते. ही माहिती मीडियापर्यंत पोहोचली होती, त्यानंतर गंभीरला दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले.
या बैठकीत गंभीरने सांगितले की ऑस्ट्रेलियाच्या दिड महिन्यांच्या दौऱ्यात संपूर्ण टीमने एकत्र बसून फक्त एकदाच जेवण केले होते. पर्थ येथील कसोटी जिंकल्यानंतर सामुहिक आनंदोत्सवही साजरा केला नव्हता. यादरम्यान खेळाडूंनी त्यांच्या कुटुंबियांसह दौऱ्यावर जाण्याच्या मुद्द्यावरही चर्चा झाली. गंभीरची इच्छा आहे की बीसीसीआयने अनुशासनहीनता पूर्णपणे दूर करण्यासाठी कोविड-१९ पूर्वीच्या नियमांकडे परत यावे. यामध्ये या दौऱ्यात दोन आठवडे कुटुंबासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. या अहवालात पुढे म्हटले आहे की, गंभीर आणि खेळाडू या मुद्द्यावर एकमत होते.
गौतम गंभीरने ज्युनियर खेळाडूंसाठी असेच कठोर निर्णय घेण्याचा सल्ला दिला. सूत्राने सांगितले- बैठकीला उपस्थित असलेल्या एका वरिष्ठ खेळाडूने बीसीसीआयला मॅच फीचे त्वरित वाटप करू नये असे सुचवले. त्याऐवजी, फी वितरीत करण्यापूर्वी खेळाडूंच्या कामगिरीचा विचार केला पाहिजे, काही खेळाडू देशांतर्गत आणि राष्ट्रीय संघ वचनबद्धतेला प्राधान्य देत नाहीत.
आता ४५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीच्या परदेश दौऱ्यांवर खेळाडूंना त्यांच्या कुटुंबियांना फक्त दोन आठवडे सोबत नेण्याची परवानगी असेल. देशांतर्गत क्रिकेट खेळणे अनिवार्य करण्यात आले असून परदेश दौऱ्यांवर वैयक्तिक कर्मचाऱ्यांवर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय मालिकेदरम्यान खेळाडूंना वैयक्तिक जाहिराती शूट करता येणार नाहीत. दहा कलमी धोरणाचे पालन करणे बंधनकारक असेल. तसे न झाल्यास बीसीसीआय कारवाई करेल. यापुढे, दौऱ्यात खेळाडूंना स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही आणि सामना लवकर संपल्यास लवकर बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार नाही.
भारताच्या राष्ट्रीय क्रिकेट संघात शिस्त आणि एकात्मता वाढवण्यासाठी हे धोरण लागू करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका पराभव आणि न्युझिलंडविरुद्ध घरच्या मैदानावर व्हाईटवॉश झाल्यानंतर संघात दुफळी निर्माण झाल्याच्या आणि खेळाडू एकत्र बसत नसल्याच्या बातम्या आल्या. अशा स्थितीत बीसीसीआयने हे धोरण राबविणे आवश्यक मानले जेणेकरुन खेळाडूंची कामगिरी आणि वचनबद्धता सुधारता येईल.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या सांगण्यावरून बीसीसीआयने हे पाऊल उचलले आहे. स्टार कल्चर संपवण्याची मागणी प्रशिक्षकाने केली आहे. संघाच्या नुकत्याच झालेल्या खराब कामगिरीच्या आढावा बैठकीत गंभीरने या मंजुरीची मागणी केली होती. स्टार क्रिकेटपटू रणजीपासून दूर राहिल्यानेही असे करण्यात आले आहे.
खेळाडू सामन्यांना जाऊन संघासोबत सराव करतील. एका सुपरस्टार खेळाडूने गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासह अनेक दौऱ्यांवर स्वतंत्रपणे प्रवास केला. नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दोन मोठ्या स्टार्सनी संघांसोबत प्रवास करण्यास नकार दिला होता.
येथून पुढे प्रत्येक खेळाडूला या नियमांचे पालन करावे लागेल. खेळाडूंचे कुटुंबीय दौऱ्यावर (४५ दिवसांपेक्षा जास्त) फक्त २ आठवडे राहतील. क्रिकेटपटूंना देशांतर्गत क्रिकेट खेळणे बंधनकारक आहे. मालिके दरम्यान खेळाडूंना वैयक्तिक जाहिराती करण्यासही बंदी घालण्यात आली आहे. दौऱ्या दरम्यान खेळाडूंना स्वतंत्रपणे प्रवास करण्याची परवानगी दिली जाणार नाही. जर दौरा किंवा सामना लवकर संपला तर त्यांना लवकर निघू दिले जाणार नाही. खेळाडू संघासोबत तसेच सामने आणि सराव सत्रादरम्यान येतील आणि जातील. खेळाडूंनी परदेशात जाताना १५० किलोपेक्षा जास्त सामान घेतल्यास त्यांना अतिरिक्त रक्कम स्वतः भरावी लागेल. तसेच देशांतर्गत मालिकात हि मर्यादा १२० किलोपर्यंतची असेल. खाजगी व्यवस्थापक, स्वयंपाकी, सहाय्यक आणि सुरक्षा कर्मचारी यांना टूर किंवा मालिकेतून बंदी घातली जाईल. बीसीसीआय च्या कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागेल. सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये उपकरणे पाठवण्यासाठी संघ व्यवस्थापनाशी समन्वय साधावा लागेल. या धोरणाचे पालन न करणाऱ्या खेळाडूंना केंद्रीय करारातून त्यांच्या रिटेनर फीची कपात करणे आणि आयपीएलमध्ये सहभागी होण्यापासून प्रतिबंधित करण्यासह दंड आकारला जाईल.
दौऱ्यावर कुटुंबाच्या मुक्कामाच्या कालावधीसह कोणत्याही विश्रांतीसाठी खेळाडूंना गंभीरसह मुख्य निवडकर्ता आगरकर यांची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आली आहे. क्रिकेटपटूंना बोर्डाच्या कार्यक्रमांनाही उपस्थित राहणे बंधनकारक असेल. मालिका लवकर संपल्यास खेळाडूंना शेवटपर्यंत एकत्र राहावे लागेल. व्यवस्थापक, स्वयंपाकी, सहाय्यक आणि सुरक्षा कर्मचारी यांना बीसीसीआयने स्पष्टपणे परवानगी दिल्याशिवाय या दौऱ्यावर किंवा मालिकेपासून बंदी घातली जाईल.
ऑस्ट्रेलियामध्ये राष्ट्रीय संघाच्या खराब कामगिरीनंतर, बीसीसीआयने गुरुवारी सौराष्ट्रचे माजी फलंदाज सितांशु कोटक यांची इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी भारताचे फलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली. सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. बावन्न वर्षीय कोटक हे दीर्घकाळ राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमी मध्ये फलंदाजी प्रशिक्षक होते.
वरील सर्व नियम जर प्रामाणिकपणे लागू केले तर भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनातही कमालीची सुधारणा होईल व त्याचा सकारात्मक परिणाम सांघिक कामगिरीवरही होईल. त्यामुळे टिम इंडियाची जिंकण्याची टक्केवारी आपोआप सुधारेल.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२