महापूजा ना. झिरवाळ व आ. लहामटे यांचे हस्ते..
अकोले ( प्रतिनिधी ) महामुनी अगस्ति महाराज आश्रमात महाशिवरात्रीचा पावन पर्व काळात अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व दोन दिवसीय महाशिवरात्र यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष अध्यक्ष ॲड. के. डी. धुमाळ व विश्वस्त ह.भ.प. दिपक महाराज देशमुख यांनी दिली. महाशिवरात्री ची महापूजा अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.नरहरी झिरवळ व तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांचे शुभहस्ते होणार आहे.
महाशिवरात्री निमित्ताने २० ते २७ फेब्रुवारी २०२५ या काळात महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार यांचे प्रवचन व किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. २० फेब्रुवारी स.८ वा. योगी केशव बाबा, समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर, सेवादास महाराज यांचे शुभहस्ते ध्वजारोहण, घटस्थापना, विणा पूजन होईल.
कार्यक्रमात श्री महंत शब्दप्रभू प्रमोदजी महाराज जगताप बारामती, विद्याविनोदवैभव पांडुरंगजी महाराज गिरी वावीकर, कृष्णप्रेमी प्रेममूर्ती भगीरथी महाराज काळे धारणगावकर, संजयजी महाराज वेळुकर सातारा, आचार्य शुभमजी महाराज कांडेकर श्रीरामपूर, भागवतजी महाराज कबीर पंढरपूर, मनोहरजी महाराज भोर अंबड यांचे रात्री ७ वा किर्तन होणार असून २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी अध्यापक परमेश्वरजी महाराज जायभाय याचे काल्याचे कीर्तन होईल. तर ह.भ.प. अरुण महाराज शिर्के कळस, रोहित महाराज राक्षे उंचखडक, सुरेश महाराज भालेकर खानापूर , राजेंद्र महाराज सदगीर मुथाळणे, रमेश महाराज भोर धामणगाव पाट, अमोल महाराज भोत रुंभोडी यांची प्रवचन सेवा होणार आहे. या किर्तन कार्यक्रमात अकोले तालुक्यातील गायक, वादक उपस्थित राहणार आहेत.
२६ फेब्रुवारी महाशिवरात्री ला पहाटे ३ वा. अन्न व औषध प्रशासन मंत्री ना.नरहरी झिरवळ, सौ चंद्रभागा झिरवाळ व तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे सौ पुष्पाताई लहामटे यांचे शुभहस्ते महापूजा होऊन मंदिर दर्शनास खुले होणार आहे. तसेच विविध विकासकामांचे भूमीपूजन करण्यात येणार आहे. २७ ला दु. ४ वा. जंगी कुस्त्यांचा हगामा आयोजित केला आहे .मंदिर व परिसराला सुशोभीकरण, रंगरंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तरी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थानचे विश्वस्त बद्रीनारायण मुंदडा, मनोहर महाराज भोर, गुलाबराव शेवाळे, परबतराव नाईकवाडी, राजेंद्र महाराज नवले, गणेश महाराज वाकचौरे, मच्छिंद्र भरितकर, व्यवस्थापक रामनाथ मुतडक यांनी दिली. उत्सवाच्या तयारीसाठी रमेश नवले, बाळासाहेब घोडके, नवनाथ गायकवाड, सुरेश वाकचौरे, रामनिवास राठी, सतिश बुब, रावसाहेब देशमुख आदी परिश्रम घेत आहेत..