अहिल्यानगर / प्रतिनिधी:
नवी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात येथील प्रथित यश लेखिका व कवयित्री सुजाता नवनाथ पुरी यांच्या कवितेची कवी कट्टा या कार्यक्रमासाठी सलग चौथ्यांदा निवड झाली आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये सलग चौथ्यांदा कविता निवडीचा मान मिळविणाऱ्या त्या अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव कवयित्री आहेत.
यापूर्वी उदगीर येथे झालेल्या ९५ व्या साहित्य संमेलनात त्यांची आठवण ही कविता तर वर्धा येथे झालेल्या ९६ व्या साहित्य संमेलनात पानगळ ही कविता तसेच अंमळनेर येथे गेल्या वर्षी झालेल्या ९७ व्या साहित्य संमेलनात ज्योत या कवितेची निवड झाली होती. यावर्षी दिल्ली येथे होणाऱ्या ९८ व्या साहित्य संमेलनासाठी वेडी प्रित या कवितेची निवड झाली आहे.
सुजाता पुरी यांचा ऋतू अंतरीचे हा कवितासंग्रह व वाटेवरच्या मशाली हा लेख संग्रह प्रसिद्ध झालेले आहे. या दोन्ही पुस्तकांना आतापर्यंत अनेक पुरस्कार देखील प्राप्त झालेले आहेत.दैनंदिन जीवनामध्ये घडणाऱ्या घटनांवर आधारित त्यांच्या कविता व लेख हे वाचकाच्या अंतर्मनाचा ठाव घेतात.
सलग चौथ्यांदा त्यांच्या कवितेची अखिल भारतीय साहित्य संमेलनासाठी निवड झाल्याबद्दल जिल्ह्यातील व राज्यातील अनेक मान्यवर लेखक कवी व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी १९ तारखेला पुण्यातून निघणाऱ्या विशेष रेल्वेने त्या नवी दिल्लीला रवाना होत आहेत.
वृत्त प्रसिद्धी सहयोग
समता मीडिया सर्व्हिसेस श्रीरामपूर - 9561174111