एरंडोल :- शास्त्री फाउंडेशन संचालित शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, पलासदळ, एरंडोल येथे सोमवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२५ रोजी व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळा उत्साहात पार पडली. या कार्यशाळेस जगविख्यात प्रशिक्षक प्रा. सुरेश पांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक भूमिका महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी स्पष्ट करत विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्व विकासाचे महत्त्व पटवून दिले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय व कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. योगेश्वरी लोहार यांनी अतिशय उत्तम प्रकारे केले.
विद्यार्थ्यांसाठी अमूल्य मार्गदर्शन...
प्रा. सुरेश पांडे यांनी आपल्या अनोख्या शैलीत विद्यार्थ्यांसमोर संभाषण कौशल्य, स्मरणशक्तीचा विकास, वेळेचे व्यवस्थापन, ताण-तणाव नियंत्रण, निर्णय क्षमता, गटचर्चा व वैयक्तिक मुलाखतीचे तंत्र या महत्त्वाच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.विशेषतः, मुलाखतीदरम्यान विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील प्रभावी उपाययोजना यावर त्यांनी मूलभूत टिप्स दिल्या. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आव्हानांना कसे सामोरे जावे, याबाबत त्यांनी उपयुक्त मंत्र दिले.
महाविद्यालयाच्या नेतृत्वाची महत्त्वपूर्ण भूमिका..
ही कार्यशाळा यशस्वी करण्यामागे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री आणि सचिव सौ. रूपा शास्त्री यांची महत्वपूर्ण भूमिका होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
कार्यशाळेच्या शेवटी प्रा. श्रद्धा शिवदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. जावेद शेख, प्रा. राहुल बोरसे आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व दिशादर्शक ठरली असून, त्यातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग त्यांना भविष्यात निश्चितच होणार आहे.