मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.
मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २४०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे. गोवा गुजरात सारख्या राज्यातही मराठी भाषा काही प्रमाणात बोलली जाते. गोव्यात मराठीला समृद्ध असा इतिहास आहे. तरी देखील मराठी भाषेला विकसित करण्याचा व समृद्ध करण्याचा प्रश्न आहेच.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी मराठी भाषा अधिक समृद्ध करण्याची गरज आहे. मराठी लोकच मराठीला परकी करत आहेत.मराठी भाषा समृद्ध करण्याची जबाबदारी मराठी जणांनी व सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले पाहिजे.मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी सरकार आणि सर्वसामान्यांना एकत्र काम करावे लागेल. मराठी भाषा समृद्ध करण्याचे काही मार्ग येथे आहेत. मराठी भाषेच्या विकासासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत. मराठी भाषेच्या विकासासाठी शासनाने सर्व मराठी शाळांना १०० टक्के अनुदान द्यावे. मराठी भाषेच्या विकासासाठी शासनाने मराठी माध्यमात शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेतन द्यावे. मराठी भाषेच्या विकासासाठी शासनाने बालवाडी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक पोषण दिले पाहिजे. मराठी भाषेच्या विकासासाठी शासनाने शैक्षणिक प्रवासासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून द्यावी. मराठी भाषेच्या विकासासाठी शासनाने प्रत्येक गावात मोफत मराठी ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. मराठी लेखक, प्रकाशक, शिक्षक, अभ्यासक, मराठी भाषेतील तज्ज्ञांनी मराठी भाषेच्या विकासासाठी जास्तीत जास्त कार्य केले पाहिजे. मराठी भाषेच्या विकासासाठी मराठी साहित्याला प्रोत्साहन दिले पाहिजे.
मराठी भाषा अधिक समृद्ध करण्यासाठी प्रथम आपण तरी आपल्या घरात मराठी बोलल पाहिजे.मराठी बोललं पाहिजे आणि त्याची गोडी इतरांना सुद्धा करून दिली पाहिजे नाहीतर भरपूर जण सांगतात की आम्ही मराठी बोलल्यावर बाकी लोक आमच्यावर हसतात, काय मराठी मराठी चालू आहे असे बोलतात? अशावेळी त्या प्रत्येकाला प्रत्येक वेली प्रत्युत्तर देणे पण योग्य नाही म्हणून त्यांना आपण प्रथम त्यांना मराठीची गोडी निर्माण करून दिली पाहिजे.
शासकीय कामकाज व कार्यालयीन भाषा मराठीच असायला पाहिजे.मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने शासकीय कामकाजाची भाषा म्हणून मराठीची सक्ती केली आहे.तसा आदेश निर्गमित केला आहे.हा निर्णय स्तुत्य असला तरी या आदेशाची अंमलबजावणी प्रामाणिकपणे व्हावी.या आधी देखील शासकीय कार्यालयातील पत्रव्यवहाराची भाषा मराठी असावी असा आदेश काढण्यात आला होता मात्र त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी झाली नाही.आता तरी सरकारने हा निर्णय सक्तीने राबवायला पाहिजे.
आज बघायला झाले तर परदेशातील लोक आपली मराठी भाषा शिकतात पण आपल्या देशातील काही लोक वेगवेगळे भाषांना नावे ठेवत असतात.
बघायला गेलं तर काही गरज नाही कुठल्या भाषेला नाव ठेवणं म्हणून मला तरी असं वाटतं की आपण प्रथम मराठी बोललं पाहिजे मला त्याबद्दल अभिमान असला पाहिजे आणि प्रत्येक माणसाची ओळख त्याच्या भाषेशी असते हे पण आपण विसरायला नको.मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचविण्यात आपण कुठे तरी कमी पडत आहोत..आकडेवारी काय सांगते.मराठी प्रेमाचा टाहो फोडताना वस्तुस्थितीचा विसर पडू देता कामा नये. कोणती भाषा किती लोक बोलतात याविषयी जागतिक पातळीवर केलेल्या विविध पाहण्यांवर आधारीत विविध अंदाजांनुसार चीन आणि तैवानची मॅन्डरिन ही भाषा जगात पहिल्या क्रमांकावर आहे. जगातले १४.१ टक्के लोक ही भाषा बोलतात. स्पॅनिश दुसऱ्या (५.८५ टक्के), इंग्रजी तिसऱ्या (५.५२ टक्के) आणि हिंदी चौथ्या स्थानावर (४.४६ टक्के) आहे. मराठीचा क्रम १३ ते १५ व्या क्रमांकापर्यंत आहे. जागतिक पातळीवर (आणि भारतातही!) मराठी ही भाषा कधीच दुसऱ्या/तिसऱ्या क्रमांकावर नव्हती! तशी ती असल्याचे ‘बाईट’नामक केवळ ‘अस्मितेचे हुंदके’ फोडणाऱ्यांनी ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी. राष्ट्रीय पातळीवर म्हणजे भारतात, बोलली जाणारी या निकषावर हिंदी क्रमांक एकवर (४१. ०३ टक्के), दुसऱ्या स्थानावर बंगाली (८.११ टक्के) आणि तेलगू तिसऱ्या स्थानावर (७.१९ टक्के) आहे. आपल्या देशात मराठी भाषा बोलणारे लोक केवळ ६.९९ टक्के असून मराठीचा क्रमांक चौथा आहे.
मराठी बोली भाषेचा विसर होतो आहे..मराठी भाषा अधिक समृध्द करण्यासाठी बोली भाषेचे जतन होणे आवश्यक आहे.
मराठीला खूप बोलीभाषा लाभल्या आहेत. प्रसिद्ध भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये १९६१ मध्ये ११०० बोलीभाषा होत्या. गेल्या पाच-सहा दशकांत त्यातील ३०० बोलीभाषा संपुष्टात आल्या. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर बोलीभाषा मरण पावण्याचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात आजही ५३ बोलीभाषा आहेत. डॉ. देवी यांच्या या विधानाला पुष्टी देणारा संत नामदेवांचा एक अभंग आहे. त्यात त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’ची महती सांगताना म्हटले आहे,
ज्ञानराज माझी योग्यांची माउली।
जेणे निगमवल्ली प्रगट केली।
छपन्न भाषेचा केलासे गोरव
भवार्णवी नाव उभारिली।।
ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्वरी’सारख्या ग्रांथिक प्रबंधरचनेत ५६ भाषांना स्थान दिले. त्यातील बहुतेक भाषा मराठीच्या बोलीभाषाच होत्या यात शंका नाही. आजही मराठीच्या कोकणी, मालवणी, अहिराणी, आगरी, बाणकोटी, मराठवाडी, तावडी, पावरी, वऱ्हाडी, कोयाबोली, गौंडी, डांगी, भिलोरी, गोरमाटी, कादोडी, पुवारी, झाडीबोली यांसारख्या अनेक बोलीभाषा आहेत. मौखिक परंपरेचा मूळ स्रोत मुख्यत्वे या बोलीभाषांतून आला आहे. बोलीभाषा हीच त्या त्या लोकसंस्कृती टिकवून ठेवते. बोलीभाषेने मूळ भाषेला किंवा प्रमाणभाषेला अजिबात कमीपणा येत नाही, उलट अशी बोलीभाषा ही मायभाषेचे सत्व पोसते आणि योग्य अन्वर्थक शब्दांची मायभाषेला उणीव भासते, त्या वेळी ती धावून येते. कितीतरी म्हणी, वाक्प्रचार लोकोक्ती हे बोलीभाषेतून प्रमाण भाषेत आले आहेत.त्यामुळे बोली भाषेचे जतन,संरक्षण करणे आवश्यक आहे.
लेखन व संपादन:
प्रा. दिलीप आ.जाधव
राज्य कोषाध्यक्ष*
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ, महाराष्ट्र राज्य.