shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निंदकाचे घर असावे शेजारी..!भाग ०२..

      असे म्हणतात की, निंदकाचे घर असावे शेजारी..! माझ्या आयुष्यात मला तर ही म्हण अगदी तंतोतंत लागू पडते.. वार शुक्रवार.. दि. १४ फेब्रुवारी २०२५.. व्हॅलेंटाईन डे..  या दिवसी असा काही प्रसंग घडला की,.. निंदकाचे घर असावे शेजारी चा भाग ०२ प्रकर्षाने लिहावासा वाटला.. निंदकांच्या अफाट प्रेमातून वाट काढत काढत आज कुटुंबातील एक महत्वाचे अभियान पूर्ण झाले.. निंदकांचे ते प्रेम जिवनात जवळ्पास प्रत्येकाच्या वाट्याला येते.. पण.. त्याच्याकडे कोण कश्या पद्धतीने पाहतो यावर आपला जीवन प्रवास अवलंबून असतो... 


     माझ्या आयुष्यातही असेच काहींसे घडले आहे.. जे बहुतेकांच्या आयुष्यात घडत असते.. पण, त्याचे लिखाण फार थोडे होत असल्याने बरेच कुटुंब घाबरून उध्वस्त होताना मी पाहिले आहेत.. त्यामुळे मी आज पुन्हा दुसऱ्यांदा हा लेख लिहीत आहे.. माझा हा लेख वाचुन मी किमान एक कुटुंब जरी वाचवू शकलो तरी मला वाटते की माझे लिखाण सार्थकी लागले.. परंतु,  तो भाग ०२ प्रकाशित करण्यापूर्वी यापूर्वी लिहिलेल्या याच मालिकेच्या पूर्वपिटिकेचे आपल्याला स्मरण व्हावे म्हणून यामधील भाग ०१ पुन्हा प्रकाशित करत आहे.. जेणेकरून आपल्याला त्याखाली लिहलेला भाग ०२ विस्ताराने लक्षात येईल..

प्रासंगिक:- ..
पूर्व पिठिका... (मागील भाग)
(दि. २५ जानेवारी २०२३)

📌 निंदकाचे घर असावे शेजारी..!  भाग ०१ 

असे म्हणतात की, निंदकाचे घर असावे शेजारी..! आणि, ते खरेही आहे.. सकारात्मक दृष्टीने पाहिले तर त्याचे फायदेच जास्त आहेत..
    या निंदकांमुळे आज मी देना बँकेतून कर्जमुक्त झालो.. माझ्या ७/१२ उताऱ्यावरून देना बँकेचे सर्व बोजे आज उतरले.. 
       हे लिहण्याचा उद्देश म्हणजे कर्ज फिटल्याचे अप्रुप सांगणे हा  नसून,  त्या सर्व निंदकांना माहीती व्हावी आणि त्यांनी आमचेकडील धुणे संपल्याने दुसऱ्या एखाद्या मोठ्या धोबी घाटावर नोकरी पत्करावी इतकाच आहे. शेवटी त्यांना जसी आमची चिंता आहे तशी आपणही त्यांची काळजी घेतली पाहिजे. 
      त्याचे झाले असे की, मी देवळाली प्रवरा येथील देना बँक कडून शेती कर्जासह पोल्ट्री फार्म साठीही कर्ज घेतले होते.. त्या पोल्ट्री व्यवसायासाठी शासनाने नाबार्ड ची सबसिडी दिली होती.. परंतू अताची बडोदा बँक म्हणजेच तत्कालीन देना बँकेने नाबार्ड कडे नियमानुसार सबसिडीचा माझ्या नावाचा प्रस्तावच नाबार्ड ला पाठवला नाही.. ही बाब जेंव्हा माझ्या लक्षात आली तेंव्हा मी सबसिडी मिळेपर्यंत पोल्ट्री सह शेतीचे कोणतेही कर्ज न भरण्याचा निर्णय घेतला.. पर्यायाने माझे शेतीचे सर्व कर्ज खाते थकले.. त्यामध्ये पीक कर्ज, विहीर, पाईप लाईन, ठिबक व तुषार संच, अशी विवीध खाती होती.. त्यामुळे कर्जाची आकडेवारी दिवसेंदिवस फुगत गेली. ती जवळ्पास ३३ लाख रुपये झाली.
        या सर्व थकलेल्या खात्यांमुळे माझेत आणि बँकेत विसंवाद सुरु झाले.. आमचा वाद न्यायप्रविष्ट झाला.. जामिंनदारांना मे. न्यायालयाच्या नोटिसा निघाल्या.. त्यावरील थक रकमा निंदकांकरवी गावभर फिरल्या..  त्याचा थोडासा मानसिक त्रास मला जसा झाला तसा तो माझ्या जामिंनदारांनाही सहन करावा लागला.. पण या सर्व घटने मागील.. म्हणजे कर्ज थकविण्या मागील आमचा उद्देश कुणीही समजून घेतला नाही.. 
     जो कोणी कर्ज घेतो, त्यांचे ऐपती प्रमाणेच त्याला बँक कर्ज देते.. आणि घेतलेले कर्जही त्यालाच भरायचे असते.. पण काही मंडळी तुम्ही काढलेल्या कर्जाने तुमच्या पेक्ष्याही जास्त अस्वस्थ असतात.. जसे काही तुमचे कर्ज भरण्याची जबाबदरी त्यांच्या शिरावर येणार आहे... 
        काहींनी तर इतके टेन्शन घेतले की,  देवळाली प्रवरा मधील सर्व बँकांमध्ये असलेल्या आमच्या कर्ज खात्यांची या महाभागांनी माहिती मागविली.., आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे आपले राजकीय वजन वापरून आम्हाला नोटीसा बजावण्याचे प्रयत्न केले.. त्यामध्ये नगरपालिकेची कामगार पतसंस्थाही (०३ लाख रुपये) माझेकडून तातडीने भरून घेतली... हे सर्व उपद्व्याप करण्याचा उद्देश एकच असावा... तो म्हणजे आम्ही जास्तीत जास्त आर्थिक अडचणीत कसे येवू.. आणि, आमची समाजात जास्तीत जास्त बे-अब्रू कशी होईल.. असो.... 
       खरंच, ही निंदक मंडळी आपली किती काळजी घेत असतात हे वरील काही प्रसंगावरून आपल्या लक्षात येईल.. त्यामुळे त्यांचेवर कधी नाराज व्हायचे नसते हे आज मला झालेल्या मोठ्या आर्थिक फायद्याने उमगले.. 
         आमच्या हितचिंतक निंदकांनी आमच्या थकबाकी कर्जाचा आणि झालेल्या कोर्टबाजीचा पूर्ण फायदा घेतला.. आणि आमचेवर फार कर्ज असल्याचा गावभर आणि नातेवाईकांमध्ये डंका पिटला..,  इतकेच काय, आमचेवर खुप कर्ज झाले असल्याचे सांगून थेट माझ्या मुलांच्या सोयरिकीमध्ये सुध्दा खोडा घालण्याचे काम या मंडळींनी केले.. परमेश्वर त्यांच्या मुलांचे मात्र कल्याण करो. कारण प्रत्येकाला आपल्या कर्माची फळं इथेच भोगायची आहेत.. 
     तेच जर.. आम्हीं आमच्या हक्काची सबसिडीची लढाई कशी लढलो... त्यात आमची मागणी काय होती..  आणि, त्याचा मला कसा लाभ झाला.. हे जर या निंदकांनी आमच्या थकबाकीच्या माहिती सोबत गावात किंवा इतरत्र पसरविले असते.. तर, कदाचित बऱ्याच शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला असता..  किंवा, बऱ्याच शेतकऱ्यांना भविष्यात येणाऱ्या अश्या पद्धतीच्या अडचणींना कसे सामोरे जायचे याचा लाभ झाला असता.. परंतू कदाचित या निंदकांचे फक्त मझेवरच प्रेम असावे.. म्हणून त्यांनी अर्धेच सत्य नगरपालिकेच्या सभेत चर्चा करून बाहेर पसरविले..  असो.. 
    न्यायालयात बँकेला आमची एकच मागणी होती की, बँकेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे आम्हाला जवळ्पास पाच लाखाची सबसिडी मिळाली नाही.. त्यामुळे जसे आपण कर्जाला व्याज लावतो तसे आमच्या त्या सबसिडी रकमेला व्याज लावून होणारी रक्कम आमचे कर्ज रकमेतून वजा करा.. मी लगेच उर्वरित कर्ज भरतो.. 
     काय चुकले यात...?,  आम्ही आमच्या हक्काची लढाई लढलो..!  आणि जिंकलोही..! 
    अखेर या निंदकांच्या करणाम्यामुळे आम्ही  न्यायालयामधे हे कर्ज प्रकरण बँकेसोबत सामोपचाराने मिटविण्याचा निर्णय घेतला..,  त्यामध्ये बँकेनेही आम्हाला साथ दिली..,  आणि आम्हाला मिळणाऱ्या नाबार्डच्या सबसिडी पेक्ष्याहि जास्त सवलत  मिळाल्याने  बँकेने आमचे सोबत सामंजस्याने समझोता केला. व सर्व थकीत कर्ज आम्हीं भरले.. 
     त्यामुळे, अखेर... देना बँकेने दिलेल्या कर्जातून आम्हीं मुक्त झालो..! 
     आणि.., आमचा ७/१२ कोरा झाला..! 
      आमच्या कर्जमुक्तीचे सर्व श्रेय त्या निंदकांना जाते, ज्यांनी देना बँकेने आम्हाला दिलेल्या आमच्या कर्जाचे आणि आमच्या थकबाकीचे आमच्या पेक्षा जास्त टेन्शन घेतले.., बँकेने सतत आम्हाला नोटीसा देवून त्रास द्यावा म्हणुन सातत्याने प्रयत्न केले..., व..,  सर्वत्र आम्हाला कर्जबाजारी ठरवून आमचा शक्य तितका जास्तीत जास्त प्रचार प्रसार केला.., व आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. 
     म्हणुन.., आमच्या कर्जमुक्ती मध्ये आम्हाला सातत्याने मदत कर्णाऱ्यांसोबत.. त्या सर्व निंदकांचे जाहीरपणे विशेष  हार्दिक आभार व्यक्त करणे आम्हीं आमचे कर्तव्य समजतो..!   
       खरंच..,  निंदकांचे घर असावे शेजारी..! धन्यवाद.., 
       (क्रमशः)...
      हा मागील भाग आपल्या माहितीसाठी दिला आहे.. आता आपण तब्बल दोन वर्षांनी याचा पुढील भाग क्र .०२ लिहित आहोत.... तो खालील प्रमाणे..
--------------------------------------------------
📌निंदकाचे घर असावे शेजारी..!  भाग ०२..
दि.१४/०२/२०२५ (व्हॅलेंटाइन डे)
     आमच्या डोक्यावर खूप मोठे कर्ज आहे. आम्हाला राहायला नीट घर नाही.. लवकरच आमच्या जमिनीचा लिलाव होईल.. असे सांगून मोठा मुलगा वैभव याच्या लग्नाच्या सोयरीकीत खोडा घालण्याचे काम या निंदक मंडळींनी बऱ्याच वेळेस केले. निंदकाचे घर असावे शेजारी या मालिकेतील पहिला भाग वाचून खरी वस्तुस्थिती समोर आल्यानंतर एका मुलीचा मामा घरी येऊन मला भेटला.. व दुसऱ्याचे ऐकून आम्ही आमच्या भाचीचे खूप मोठे नुकसान केले हे मोठ्या मनाने बोलून गेला.. त्यांना नक्की काय म्हणायचे हे मला लवकर कळालेच नाही.. मग त्यांनी विस्ताराने मला निंदकांचे नाव घेऊन सांगितले की.., आमची भाची तुमच्या मुलाला देण्यासाठी आम्ही तुमचा मुलगा वैभव याला पाहण्यासाठी येणार होतो.. परंतु अमुक अमुक व्यक्तींनी.. म्हणजे निंदकांनी रस्त्यातच आम्हाला थांबवून सांगितले की, त्यांच्यावर खूप मोठे कर्ज आहे.. त्यांना नीट राहायला घर नाही.. त्यांच्या जमिनीचा सुद्धा लवकरच लिलाव होणार आहे.. असे असताना तुम्ही तिथे मुलगी देऊन पश्चाताप करून घेवू नका.! त्या व्यक्तींला तेंव्हा मी खूप मानत असल्याने आमचा नावीलाज झाला.. व, आम्हाला तसेच मागे फिरावे लागले.. आता माझ्या भाचीचे लग्न झाले आहे.. तिला ज्या ठिकाणी दिले ते घर तर पत्र्याचे आहेच.. शिवाय.., नवरा पेताड निघाला.. त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात खुरपणीचे काम करण्या शिवाय भाचीला पर्याय नाही.. लोकांचे ऐकुन आम्ही आमच्याच पायावर धोंडा पाडून घेतला.. हे डोळ्यात पाणी आणून सांगतानाचे त्यांचे वाक्य काळजात खोलवर रुतले.. खरे तर अशा लोकांपासून प्रत्येक मुलीच्या बापाने सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे..
         आमच्या कुटुंबाच्या प्रगती मध्ये हातभार लावण्यासाठी आमच्या निंदकांचे काम जोमाने सुरू असतानाच आम्ही नविन घर बांधायला घेतले होते... घराचे काम प्लिंथ पर्यंत आले असतानाच देना बँक आमच्यावर सोडून घराच्या बांधकामात खोडा घालण्याचा निंदकांचा पहिला प्रयत्न बँकेसोबत आम्ही केलेल्या तहामूळे अयशस्वी झाला...  त्यामुळे घराचे काम काही काळ थांबवून देणा बँकेचे ३३ लाख रुपये थकीत कर्ज भरण्याला आम्ही प्रथम प्राधान्य देत अगोदर ७/१२ उतारे कोरे करून घेतले... 
        त्याच काळात आमच्या कुटुंबामागे शुक्लकाष्ठ कायम ठेवून घराच्या बांधकामात खोडा घालण्यासाठी निंदकानी नवीन खेळी खेळली...  
      काही कारणास्तव मी नगरपालिकेच्या नोकरीचा राजीनामा दिल्याने नगरपालिकेच्या कामगार पतसंस्थेच्या तिन लाख रुपये कर्जाचे हप्ते थकले होते... निंदकांनी माझी देना बँक भरून घेतल्यावर आपला मोर्चा नगरपालिकेच्या श्री त्रिंबकराज कामगार पतसंस्थेकडे वळविला... त्यांना वाटत असावे की, माझी सततची आर्थिक कोंडी केली म्हणजे माझे घराचे चालू असलेले बांधकाम होणार नाही.. व समाजात माझे हसू होईल.. परंतु परमेश्वराला ते मान्य नसावे.. म्हणतात ना.. कावळ्याच्या शापाने ढोरे मरत नसतात..! तसेच काहीसे माझ्याबाबत घडत होते..
      मोठा मुलगा वैभव याच्या लग्नाच्या ऐन हळदी समारंभाच्या दिवशी आमचे सर्व कुटुंब  हळदीच्या कार्यक्रमात व्यस्त असताना अगदी खाजगी सावकारालाही लाजवेल या पद्धतीने नगरपालिकेच्या कामगार पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमनने माझ्या घरी हळदीचा कार्यक्रम सुरू आहे हे माहीत असतानाही दुपारी ४ ते ५ च्या दरम्यान निर्लज्जपणे मला फोन करून सांगितले की.., कामगार पतसंस्थेची बाकी वसुलीसाठी आम्ही सर्व संचालक मंडळ आपल्या घरी येत आहोत.. त्यांना माझ्या घरी येऊन माझ्या नातेवाईकांना दाखवायचे असावे की मी किती कर्जात डुबलेलो  आहे.. बाकी पुढचे आपणास सांगण्याची आवश्यकता नसावी.. परंतु मीही कोणत्याही प्रकारची भिड न ठेवता त्या चेअरमनला लगेच सुनावले.. की, कोणतीही नोटीस दिल्याशिवाय तुम्हाला माझ्या घरी वसुलीला येता येणार नाही..! कामगार पतसंस्थेकडे माझे घर किंवा जमीन तारण नाही..! त्यामुळे पाहुणे म्हणून आलात तर मुलाच्या हळदीमध्ये  प्रेमाने चहा व जेवणाचा पाहुणचार मिळेल..! मात्र.., जर.., बेकायदेशीर रित्या कामगार पतसंस्थेचे वसुली अधिकारी म्हणून माझ्या घरी येणार असाल तर तुमचा पाहुणचार वेगळ्या पध्दतीने केला जाईल..  ही भाषा कदाचित त्यांना लवकर समजली असावी की काय.. म्हणुन.. माझ्या निंदकांना त्यांच्या या चमच्यांमार्फत माझ्या मुलाच्या लग्नात विघ्न आणता आले नाही... त्यामुळे मुलाचे लग्न दैव योगाने सुरळीत पार पडले.. लग्नानंतर मी स्वतः कामगार पतसंस्थेमध्ये जाऊन संस्थेकडे असलेली माझी जवळपास लाखभर रुपयांची ठेव कर्जात वर्ग करून माझे थकीत कर्ज भरून टाकले.. व कित्येक वर्ष काही कामगारांची थकबाकी वसूल करू न शकलेल्या तत्कालिन कार्यतत्पर संस्था अधिकारी व पदाधिकारी यांनी माझ्या बाबतीत दाखविलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे आभार मानले..
         निंदकांच्या प्रयोगातील एक भाग तर असा होता की,  तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल.. या निंदकांनी एक दिवस देना बँकेचे नाव सांगुन तीन मोटरसायकलवर सात जण माझ्या घरी भर दुपारी वसुली अधिकारी म्हणुन खाजगी गुंड पाठवले.. आपल्या चार चाकी गाडीचे हप्ते थकले असल्याने तुमची गाडी घेऊन जाण्यासाठी आम्ही देना बँकेकडून आलो आहोत.. असे ते मला सांगू लागले.. मी जेव्हा देना बँकेच्या साहेबांना फोन लावून द्या म्हटल्यावर  या गुंडांनी दुसऱ्याच कोणत्यातरी व्यक्तीला फोन जोडून दिला.. परंतु देना बँकेच्या साहेबांचा माझा परिचय असल्याने मी त्यांचा आवाज ओळखत होतो.. शिवाय देना बँक अशा पद्धतीने कोणतेही खाजगी वसुली अधिकारी नेमत नाहीत हे मला माहिती असल्याने व माझ्या गाडीचे सर्व हप्ते मी भरल्याची मला खात्री असल्याने मी माझ्या फोनवरून देना बँकेच्या अधिकाऱ्यांना फोन लावला.. मग मात्र या लोकांची घाबरगुंडी उडाली आणि माझ्या घरून त्यांनी तात्काळ काढता पाय घेतला.. 
         एकीकडे अचानक कर्जबाक्या भराव्या लागल्याने व दुसरीकडे मुलाचे लग्नकार्य करावे लागल्याने घराचे बांधकाम काही अंशी रेंगाळल्याने काही काळ निंदकांना आनंदाचा वाटत असताना घराचे काम कसेबसे पूर्ण करीत आणले.. त्यामध्ये निंदकांनीच कोऱ्या केलेल्या माझ्या सातबारा उताऱ्यांची मदत झाली.. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सहकार्याने लोणी येथिल प्रवरा बँकेने घर बांधकामासाठी ६५ लाख रुपये कर्ज मंजूर केले..  राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने ०६ लाख रुपये कर्ज दिले.., राहुरी फॅक्टरी येथील राहुरी अर्बन निधी संस्थेने ०५ लाख रुपये कर्ज दिले.., राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेने ०४ लाख रुपये कर्ज दिले.., आणि.. राहुरी येथील ॲड. डी. वाय.  वने पाटील नागरी सहकारी पतसंस्थेने १० लाख रुपये कर्ज देऊन आर्थिक मदत उभी केल्याने घराचे बांधकाम पूर्णत्वाकडे गेले.. देवळाली प्रवरा येथील लोकमान्य नागरी सहकारी पतसंस्थाही मदतीला धावली.. त्याचबरोबर गुहा येथील प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेमुळे तर माझी जिरायत शेती बागायत झाली.. त्यामुळे या सर्व संस्था माझ्या जीवनातील अर्थकारनामध्ये मैलाचा दगड ठरल्या आहेत..  त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.. पण..,
        हे पाहवले नाही म्हणून की काय.. निंदकांनी पुनः नवीन डाव खेळला..! माझ्या घराच्या बांधकाम करणाऱ्या मजुरालाच  माझ्या विरोधात खोटा गुन्हा दाखल करायला सांगून आमच्या पुढे नवीन संकट उभे करण्याचा प्रयत्न केला... पण.., कुणी कीतीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करुद्या.. अखेर.., काळ सर्वांना उत्तर देत असतो... त्या पद्धतीने फासे उलटे पडले.. आणि माझ्यावर केलेला प्रयोग त्यांच्या अंगाशी आला.
        प्रकरण येथवरच थांबले नाही.. अजून आम्ही जुन्या घरातच राहत होतो.. आमच्यावर निंदकांनी सर्व प्रयोग करून पाहिले..  कश्यानेच आमची प्रगती थांबेना.. म्हणुन., शेवटी गावातीलच काहीं दरोडेखोर वृत्तीच्या दहशतवाद्यांना रात्री ०१.४५ वाजता माझ्या घरी पाठवुन घर पेटवून देण्याचा व माझेसह माझ्या कुटुंबाला जिवंत जाळून मारण्याचा प्रयत्न केला गेला.. या घटनेत जरी या दरोडेखोरांना आम्हाला जाळून मारण्यात यश आले नसले तरी आमची आई मात्र या घटनेने थोड्याच दिवसात दगावली.. कारण.. या घटनेच्या मध्यरात्री दरोडेखोरांनी जाळपोळ करण्यासाठी वापरलेल्या  विस्पोटकांच्या मोठ्या आवाजाने आमची आई घाबरून गेली होती...  थरथर कापतच तिने ती संपूर्ण रात्र जागून काढली.. त्यामुळे तिचा रक्तदाब कायम जास्तच राहिला.. तिला आमची खूपच काळजी वाटत होती..  शेवटी.. या घटनेच्या नंतर थोडयाच दिवसांत आईने देह ठेवला.. आई खूप मोठ्या मनाची होती.. ती सर्वांना माफ करा म्हणायची.. या दरोडेखोरांना आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या निंदकांना नक्कीच माफी दिली असती.. परंतु., त्या घटनेत घाबरून माझी चालती फिरती आई दगावली.. त्यामुळे निंदकाचे घर असावे की नसावे शेजारी याचा विचार करावा लागणार आहे.. तुमची निंदा करून तुम्हाला योग्य मार्गावर आणण्यापर्यंत निंदकांची कृती ठीक होती परंतु हे जर माणसं मारायला निघालेत तर आता तुम्हीच सांगा हे लोक माफीला पात्र आहेत का..? आम्ही विपश्यनेतील माणसे असल्याने सबका मंगल हो..! सबका कल्याण हो..! हे धोरण अवलंबून  जीवन जगतो.. आणि ते आमच्या कृतीतून आम्ही दाखवूनही दिले आहे.. त्यामुळे.. जीवनात आम्ही स्वतः होऊन कधीही कोणाच्याही वाटेला गेलेलो नाही.. हा आमचा इतिहास आहे..! मात्र.., आमच्या कुणी वाटेला गेल्यास.. आम्हाला महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्वोच्च सहासी खेळाडू म्हणून शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे.. हे या मंडळींनी विसरू नये.. शेवटी खेळ आमच्या रक्तात आहे.. याचा कुणाला विसर पडू नये.. असो..  
       प्रकरण इतक्यावरच थांबले नाही.. राहुरी फॅक्टरी येथील एका पतसंस्थेच्या तत्कालीन चेअरमनला हाताशी धरून आमच्या कुटुंबाच्या बदनामीचा नविन डाव आखला गेला.. आम्हाला कोणत्याही प्रकारची कर्ज वसुलीची नोटीस न देता पतसंस्थेच्या माध्यमातून कुटुंबातील सर्वांची नावे कर्ज वसुलीसाठी वृत्तपत्रात छापून आमची बदनामी केली गेली.. त्या पतसंस्थेच्या विरोधात आम्ही तात्काळ आवाज उठवल्याने त्या पतसंस्थेचे सर्व संचालक मंडळ व कर्मचारी यांनी संस्थेकडून झालेली चूक मोठ्या मनाने मान्य केल्याने आम्ही तो विषय तेथेच सोडून दिला..  निंदकांनी  खेळलेल्या या डावामध्ये तत्कालीन चेअरमनचा माञ बळी गेला.. नुसतेच चेअरमन पद नव्हे तर पतसंस्थेचे संचालक पदही त्यांना सोडावे लागले..  आम्ही ठरवले असते तर किमान एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा त्या संस्थे विरोधात लावू शकलो असतो.. परंतु संस्थेचे हित लक्षात घेता आम्ही त्या घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.. कारण.., जीवनात असे खूप डाव आमच्या सोबत खेळले गेले असल्याने आम्हाला या घटनेचे विशेष असे काही वाटलेच नाही.. 
       जीवनामध्ये आपल्या सोबत कोण कधी कसा डाव खेळेल हे सांगता येत नाही.. त्यासाठी भविष्यात माझ्या या लेखाचा नक्कीच कुणाला तरी फायदा होईल यासाठी या सर्व बाबी स्पष्टपणे लिहिणे मला गरजेचे वाटले.. 
       तुमच्या जीवनामध्ये घडत असलेल्या या सर्व गोष्टींमध्ये तुम्ही जर प्रामाणिकपणे जीवन जगत असाल व तुमची नितिमत्ता जर साफ असेल.. तर, समाज रूपाने परमेश्वर सदैव तुमच्यासाठी धावून येतो.. त्याचे प्रत्यंतर मला जीवनामध्ये सातत्याने येत राहिले आहे. त्यामुळेच की काय मला जिवनात कधीच काही कमी पडले नाही..  आणि यापुढेही मला काही कमी पडणार नाही याची मला खात्री आहे.
       घर बांधकामाच्या सुरुवातीच्याच काळात निंदकांनी अशा विविध पद्धतीने चोहू बाजूने माझी आर्थिक कोंडी केली होती.. घराच्या बांधकामाला जवळपास पाच ते सहा लाख रुपयांची वाळू लागणार होती.. समोर मोठा आर्थिक प्रश्न आ वासून उभा राहिला होता.. एकीकडे शासकीय वाळूचे लिलावही बंद होते..  तर दुसरीकडे खिसा पूर्णतः रिकामा झाला होता.. काय करावे समजत नव्हते.. मात्र अचानक एक चमत्कार झाला.. घराच्या पाया खोदाईमध्ये चक्क वाळू निघाली.. आणि ती वाळू थोडी थिडकी नव्हे तर घराचे संपूर्ण बांधकाम पूर्ण होईल इतकी मुबलक वाळू परमेश्वराने मला मोफत उपलब्ध करून दिली.. हा एक निसर्गाचा व ईश्वरीय चमत्काराच म्हणावा लागेल.. म्हणतात ना.. आले देवाजीच्या मना.. तेथे कुणाचे चालेना.!
       पोल्ट्री शेड मध्ये साठवून ठेवलेल्या त्या चार एकरात पिकवलेल्या कांद्याला चांगले दिवस आले..जणू काही परमेश्वराने गाऱ्हाणेच ऐकले.. पाच हजार रुपये कांद्याला भाव मिळू लागला.. त्यामुळे गरज भासेल तेव्हा कांदा विकून एक एका देणेदारांची देणी द्यायला सुरुवात झाली.. विशेष म्हणजे सलग दोन वर्ष कांद्याला चांगला भाव मिळाला.. शेतातील ऊसही  काढणीला आला होता.. सलग दोन वर्षे चारशे टनाचे जवळ्पास ऊसाचे उत्पादन मिळाले.. मला शक्य नसेल तेव्हा बंधू अरुण आणि पत्नी नंदाने शेतातील कामाला हातभार लावला.. मोठा मुलगा वैभव याने त्याच्या व्यवसायातून.. आणि छोटा मुलगा प्रसाद याने त्याच्या नोकरीतून.. तर सुगरण लाभलेली सुनबाई पल्लवी हिने तीच्या सासूच्या बरोबरीत उत्तम रित्या गृहस्थी सांभाळून अशा पद्धतीने सर्वांनी ज्याच्या त्याच्या परीने एकाच मोहिमेवर लक्ष केंद्रित केले.. ते म्हणजे..  कुटुंबाचे कर्जमुक्ती अभियान..! 
       लोणी येथिल प्रवरा बँकेने ६५ लाख रुपये कर्ज मंजूर केले होते.. परंतू घराचे बांधकामाला लागणारी विट, सिमेंट, स्टील, फरशी आणि फर्निचर आदी सर्व  दुकानदारांनी लागेल तितका उधारिने माल दिल्याने प्रवरा बँकेची मंजूर असलेली ६५ लाख रुपयांची कर्ज रक्कम उचलण्याची गरज भासलीच नाही.. तरीही प्रवरा बँकेचे या निमित्ताने विशेष आभार मानले पाहिजे.. त्यांनी केवळ मंजूर करून ठेवलेल्या कर्जामुळे एका बाजूला खूप मोठा मानसिक आधार लाभला.. आणि त्यामुळेच पुढील माझ्या सर्व कमाला गती आली.. असे म्हंटल्यास वावगे ठरू नये.. कांदा, ऊस, सोयाबीन पिकातून सलग दोन वर्ष झालेले उत्पन्न आणि मुलगा वैभव आणि प्रसाद यांच्या मदतीने सर्व दुकानदार तसेच पतसंस्थांची देनी मागील दोन वर्षात वरचेवर मिटत गेली... त्यामध्ये राहुरी फॅक्टरी येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्था, राहुरी अर्बन निधी संस्था, राहुरी येथील ॲड. डी. वाय. वणे पाटील पतसंस्था या सर्वांचे देणे क्रमाक्रमाने देवुन ७/१२ उतऱ्यावरील बोजा कमी केला..
       आज व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टीस्टेट संस्थेत जाऊन त्यांचे शेवटचे देणे दिले.. आणि., आज खऱ्या अर्थाने अपणा सर्वांच्या मदत व सहकार्याने सर्व दुकानदारांचे आणि पतसंस्थांचे देणे देऊन दुसऱ्यांदा कर्जमुक्त झालो.. 
       हे लिहण्याचा उद्देश म्हणजे कर्ज फिटल्याचे अप्रुप सांगणे हा  नसून..,  त्या सर्व निंदकांना माहीती व्हावी.. आणि त्यांनी आमचेकडील धुणे संपल्याने इतरत्र कुणाची धुणी भांडी शिल्लक असेल तर पहावे.. हा आहे. शेवटी.., त्यांना जसी आमची चिंता आहे.. तशी आम्हीही त्यांची काळजी घेतली पाहिजे.. 
       कष्टकरी आणि प्रामाणिक लोकांना घर बांधताना किती संकटांना सामोरे जावे लागते हे यावरून आपल्या लक्षात आले असेलच.. नाहीतर.., हल्ली देवाधर्माच्या नावाखाली ट्रस्ट च्या आडून वर्गणी रूपाने पैसा गोळा करणे व स्वतःच्या नावावर जमिनी करून त्यावर इमारती उभ्या करणे अत्यंत सोपे झाले आहे.. जनताही अशा लोकांच्या भुलतापांना बळी पडते आणि देवाच्या नावाखाली मोठमोठ्या वर्गण्या देत राहतात हे विशेष.. गावभर फिरून वर्गण्या गोळा करण्यासाठी सोयीस्कररित्या दलालांची टोळीच काम करते.. हे भोळ्या भाबड्या जनतेला कधी कळतच नाही.. जनतेच्या पैशातून जेव्हा खाजगी मालमत्ता उभी राहते तेव्हा कुणीतरी आरडा ओरड करते.. मात्र तेव्हा वेळ निघून गेलेली असते.. जनतेलाही विसर पडलेला असतो.. आणि मग काही वर्षानंतर याच मालमत्तेचा काही भाग विकून पुन्हा कुणाला तरी टोपी घालून जमिनी खरेदी करायच्या... अशा पद्धतीने स्वतःची मालमत्ता वाढवत नेणारे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करू पाहणाऱ्या आमच्यासारख्याची निंदा करण्यातच अश्या मंडळींना धन्यता वाटत असते.. पण त्यांना माहित नसावे की देवाच्या काठीचा जरी आवाज होत नसला तरी त्याची शिक्षा मात्र भयंकर असते.. थोडक्यात काय तर सर्वांना आपल्या कर्माची फळे येथेच भोगायची आहेत.. त्यासाठी कर्म चांगलें करावे.. असो.. 
       या लेखाचा उद्देश हाच की, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक चांगल्या घराचे स्वप्न असते.. ते पूर्ण करण्यासाठी आम्हाला ज्या परिस्थितीतून जावे लागले ती वेळ कोणावर येऊ नये.. आणि आलीच तर त्या परिस्थितीमधून वाट काढत असताना कोणीही धीर सोडू नये.. समाजामध्ये चांगली मंडळी आजही मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहेत.. फक्त त्यांचा शोध तुम्हाला घेता आला पाहिजे.. त्यांची मदत तुम्हाला घेता आली पाहिजे..  त्यांच्या मदतीसाठी तुम्ही लायक असल्याचे तुम्हाला सिद्ध करता  आले पाहिजे.. यासाठी.., निंदकांच्या कुरापतीने खचून जाऊन आत्महत्येचा विचार जर कोणाच्या मनात डोकावत असेल तर त्यांनी हा लेख कायमचा जतन करून ठेवावा व आपल्या जवळपास असे कोणी निंदकांकडून ग्रासलेली मंडळी असेल तर त्यांनाही वाचण्यासाठी द्यावा.. जेणेकरून, एक जरी जीव आपण वाचवू शकलो तरी माझे हे लिखाण सार्थकी लागले असे मला वाटते...
        या लेखाची दुसरी बाजू अशी की, आपण जर आपल्या स्वतःबद्दल व्यक्त झालो नाही.. तर, आपल्याबद्दल दुसरे कोणीतरी त्यांच्या पध्दतीने व्यक्त होते.. आणि त्यामुळे समाजामध्ये आपली आणि आपल्या कुटुंबाची पद्धतशीरपणे  बदनामी करण्यात ते यशस्वी होतात.. त्यामुळे व्यक्त व्हायला शिका.. त्यातून आपले कुटुंबही घडेल.. आणि, समाजालाही दिशा मिळेल..
      आज जरी आर्थिक रूपाने मी कर्जमुक्त झालो असलो.. तरी,   ज्यांनी ज्यांनी आमच्या कुटुंबाला वेगवेगळ्या माध्यमातून मदतीचा हातभार लावला.. त्या सर्वांच्या उपकाराचे ओझे मात्र पुढील आयुष्यात सातत्याने फेडत राहावेच लागणार आहे..! याचे भान उराशी बाळगून.. आम्हाला मदत करणाऱ्या त्या सर्व ज्ञात अज्ञात देवदूतांचे मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो.!
          आणि.., हे सांगताना अतिशय आनंद वाटतो.. कि, संकटाना सामोरे जात असताना आज मात्र मी एकटा नाही.. तर.., माझे सोबत कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे.. आई-वडिलांचे,  साधु संतांचे तसेच आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री आदरणीय बच्चूभाऊ कडू यांचे आशीर्वाद सोबत आहेत.. आणि, या जोरावर गल्ली ते दिल्ली पर्यंत शासकीय स्तरावर जणसेवेची सर्व कामे आम्ही यशस्वीरित्या करीत आहोत... यासाठी शासकीय अधिकारी सुद्धा सन्मानाने आम्हाला मदत करत आहेत. यातून एकच सांगायचे.. ते म्हणजे.., आमचेकडे कोणतेही पद नसताना आमच्या हातून सामान्यांची कामे मोठ्या प्रमानात होत आहेत.. म्हणून माझेवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे आभार मानावे तितके थोडेच आहेत.. असो.. निंदा आजही सुरू आहे.., व पुढेही राहील.. परंतु ध्येय एकच आहे.. ते म्हणजे.., आपल्या सर्वांच्या सहकार्याने जणसेवेत गगण भरारी घेण्याची.. आणि अहोरात्र जनतेची सेवा करण्याची.!
        त्यामुळे आपल्या सर्वांचे प्रेम व आशीर्वाद असेच कायम पाठीशी राहो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना करतो.. आणि थांबतो..  सबका मंगल हो.! राम कृष्ण हरी.!
धन्यवाद.! 
        
शब्दांकन..
आप्पासाहेब भिमराज ढूस,
शिव छत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रथम भारतीय सुवर्णपदक विजेता आंतरराष्ट्रिय खेळाडू..
देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर 
मो. ९८२३०३५९३६
close