shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आपल्या इतिहासाचे वस्तुनिष्ठ पुनर्लेखन व्हायलाच हवे...ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत !!

घ्या समजून राजेहो

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

 काल छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती उत्साहात साजरी झाली. त्यावेळी आग्रा येथील ज्या किल्ल्यात मोगल बादशहा औरंगजेबाचा दरबार भरत असे तिथेही शिवजयंती साजरी झाल्याचा वृत्तांत एका खाजगी वृत्तवाहिनीने दाखवला होता. या वृत्तांतात याच किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांना कैदेत ठेवले होते असा उल्लेख केला गेला.

दोनच दिवसांपूर्वी समाज माध्यमावर कोल्हापूरच्या डॉ. प्रमिला बत्तासे यांची एक पोस्ट वाचण्यात आली. त्यात त्यांनी काही दिवसांपूर्वी आग्र्याला भेट दिली असता त्या ठिकाणी या किल्ल्यात शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैदेत कुठे ठेवले होते याबाबत गाईडला माहिती विचारली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे लिहिले होते. त्यानंतर त्यांनी गुगलवर शोध घेतला असता या किल्ल्यापासून सुमारे ५ ते ६ किलोमीटर अंतरावर एका जुन्या इमारतीत शिवाजी महाराजांना कैदेत ठेवले होते अशी माहिती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानुसार बत्तासे कुटुंबीय त्या इमारतीपाशी पोहोचले असता तिथल्या स्थानिकांनी देखील याच इमारतीत शिवाजी महाराजांना ९९ दिवस कैदेत ठेवले होते अशी माहिती मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे या संदर्भात तिथला गाईड काहीही माहिती द्यायला तयार नव्हता. यांनी गुगलवर शोधून ज्या जागी त्या पोहोचल्या. तिथेही गाईड आला नव्हता. जी इमारत त्यांनी बघितली तिला कोठी मीना बाजार हवेली म्हणून ओळखले जाते. ही कोठी नंतर ब्रिटिशांच्या ताब्यात होती. १८५७ मध्ये त्यांनी ही कोठी लिलावात विकली. तेव्हा राजा  जयकिशनदास या व्यक्तीने ती विकत घेतली होती. आज त्यांचे कोणीही वारसदार या इमारतीत राहत नाहीत. इमारत रिकामीच पडली आहे. उत्तर प्रदेश सरकारने या जागेवर शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा घाट घातला आहे मात्र काही अतिक्रमणकाऱ्यांनी काही जागा बळकवली आहे आणि त्याबाबत न्यायालयात वाद सुरू आहे. परिणामी ही  वास्तू जशीच्या तशी उभी आहे. 

या दरम्यान काल शिवजयंती उत्सवात बो बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही कोठी मीना बाजार हवेली ची जमीन अधिग्रहित करून तेथे महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे केले जाईल आणि ताजमहाल पेक्षाही जास्त पर्यटक तिथे येतील अशी घोषणा केली. त्यामुळे आता इथे स्मारक होणार हे निश्चित समजायला हरकत नाही.

डॉ.प्रमिला बत्तासेंनी ही माहिती समाज माध्यमांवर व्हायरल केल्यानंतर त्यांना ब्रिजेश मोगरे नामक इतिहास अभ्यासकाची पोस्ट आली. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांना या कोठी मिना बाजार हवेलीत ठेवलेले नसून मुलुखचंद हवेली नामक इमारतीत कैदेत ठेवले होते अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. बत्तासेंना सत्येन वेलणकर नामक इतिहास अभ्यासकांचीही पोस्ट आली. त्यांनीही  महाराजांना मुलुखचंद कोठीतच कैदेत ठेवले होते अशी माहिती दिली आहे. आता महाराष्ट्र शासनच कोठी मीना बाजार हवेलीत छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक करणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असल्याने त्यांनी ऐतिहासिक तथ्य तपासले असेलच असे समजायला हरकत नाही.

ही सर्व माहिती वाचल्यावर मनात एकच प्रश्न येतो की आपल्या देशात या अनेक महापुरुषांच्या इतिहासाबाबत नेमक्या अचूक नोंदी का नसाव्यात? पूर्वी अनेक वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोणत्या दिवशी साजरी करावी यावरच वाद होता. आता आग्र्याच्या कैदेत त्यांना कोणत्या इमारतीत ठेवले होते यावरूनही वाद आहे. मध्यंतरी दादोजी कोंडदेव हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते किंवा नाही आणि समर्थ रामदास स्वामी हे त्यांचे मार्गदर्शक होते किंवा नाही यावर अभ्यासकांचा वाद झाला होता. म्हणजे प्रत्येक मुद्द्यावर अभ्यासकांचा वादच का असावा? तिथेही राजकारण का केले जावे? या महापुरुषांबाबत अचूक माहिती का उपलब्ध होऊ नये? 

आपल्या देशात नवव्या किंवा दहाव्या शतकात आधी मोगलांचे आक्रमण झाले. बरीच वर्षे त्यांनी इथे राज्य केले. त्यानंतर इंग्रज आले. सुमारे दीडशे वर्षे त्यांनी राज्य केले. या दोन्ही राज्यकर्त्यांनी आपापल्या सोयीचा इतिहास लिहून ठेवला. छत्रपती शिवाजी महाराज किंवा तत्सम समकालीन भारतीय राजे आणि संस्थानिक यांनी लिहिलेला इतिहास हा कधीच समोर येऊ दिला नाही. १९४७ मध्ये इंग्रज गेले. त्यानंतर आलेले काँग्रेसचे नेहरू सरकार हे देखील इंग्रज धार्जिणेच होते. शिवाय नेहरूंना आपणच या देशाचे तारणहार आहोत हे जगासमोर ठसवायचे होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजांनी लिहिलेला इतिहासच पुढे चालवला. नव्हे त्यातही आपल्या सोयीनुसार बदल करून घेतले. इतकेच काय तर स्वातंत्र्य लढ्यातील नेहरुंचे समकालीन सरदार वल्लभभाई पटेल, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतही खऱ्या नोंदी कधीच समोर येऊ दिल्या नाहीत. त्यामुळेच आग्र्याचा गाईड सुद्धा प
बत्तासे कुटुंबीयांना चुकीचीच माहिती देत होता, आणि शिवाजी महाराजांचे आग्र्यातील कैदेचे स्थान कोणते हे सांगायला तयार नव्हता हे स्पष्ट होते.काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर एक पोस्ट आली होती. महात्मा गांधींवर नाथूराम गोडसेने गोळ्या झाडून त्यांना ठार मारले. त्याआधी देखील गांधींवर जीवघेणा हल्ला करण्याचे प्रयत्न झाले होते. हा इतिहास लोकांना सांगितला जातो. मात्र १९३९ मध्ये सरदार वल्लभभाई पटेलांवर गुजरात येथे जीवघेणा हल्ला झाला होता. हा इतिहास कायम झाकूनच ठेवला गेला. इंग्रजांची कायम हिंदू आणि मुस्लिम मध्ये झगडे लावण्याचीच नीती होती. त्यातही मुस्लिम समाज संघटित असल्यामुळे त्यांना सांभाळून घेण्याची इंग्रजांची प्रवृत्ती होती. इंग्रज गेल्यावर नेहरुंनी देखील मुस्लिमांना सांभाळून घेण्याची नव्हे लांगुलचालन करण्याचीच प्रवृत्ती जपली. त्यामुळे या देशात छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, अहिल्याबाई होळकर, महादजी शिंदे पेशवे परिवार यांचा खरा इतिहास कधीच समोर आला नाही. केवळ चुकीचाच इतिहास कागदोपत्री नोंदला गेला आणि तोच इतिहास शाळा महाविद्यालयात शिकवलाही गेला. देशात राष्ट्रवादी विचारांच्या नरेंद्र मोदींचे सरकार आले, आणि त्यांनी इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा प्रस्ताव मांडला, तेव्हा काँग्रेस आणि डाव्या मंडळींनी कायम विरोधच केला.  इतिहासाचे आणि शिक्षणाचे भगवीकरण केले जात असल्याचा कांगावा केला गेला. कारण हे पुनर्लेखन होणे आणि त्यात नेमकी तथ्ये समोर येणे त्यांच्या सोयीचे नव्हते. त्यांनी अल्पसंख्यांक समाजाचे कायम लांगुलचालन करण्याचे धोरण ठेवले. त्यामुळे ज्या औरंगजेब आणि अकबराने हिंदूंवर अत्याचार केले त्यांच्या नावाने आजही राजधानीत स्मारके आहेत. दिल्लीत औरंगजेब रोड आणि अकबर रोड आजही अस्तित्वात आहेत. मोगल बादशहा बहादुर शहा जफर याच्या नावेही दिल्लीत एक रस्ता आहे. ज्या सेंट झेवियरने ख्रिस्ती धर्मात येण्यासाठी हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले होते, त्या सेंट झेवियर च्या नावाने आजही देशभरात शाळा सुरू आहेत. तिथे आमची मुले शिकायला जातात आणि भगवद्गीता वाचण्याऐवजी बायबल वाचायला शिकतात. देशाचे पहिले पंतप्रधान आणि काँग्रेसी नेते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या एका पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा दरोडेखोर असा उल्लेख केला होता अशी माहिती आहे. आज त्यांचा पणतू राहुल गांधी हे छत्रपतींच्या जयंतीला त्यांना श्रद्धांजली वाहतात. एकुणच सर्व गोंधळच गोंधळ म्हणावा लागेल.

 त्या तुलनेत जी स्मारके जपायला हवी होती, जो खरा इतिहास लोकांसमोर यायला हवा होता, ती स्मारके जपली गेली नाहीत, आणि खरा इतिहासही लोकांसमोर आला नाही. पुण्यातील शनिवार वाडा हे पेशव्यांच्या कर्तृत्वाचे खरेखुरे स्मारक म्हणता येईल. मात्र १९८५ साली मी पुण्यात गेल्यावर शनिवार वाडा पाहायला म्हणून आवर्जून गेलो. तर आत सर्व भिंती पडलेल्या होत्या आणि प्रत्येक दालनाच्या खुणा ठेवून तिथे छोटे छोटे फलक लावले होते. शनिवार वाडा म्हणजे आत काही खोल्या असतील, त्यात पेशव्यांचे जुने अवशेष असतील अशा आशेने मी गेलो होतो. या वाड्याचे हे भग्न स्वरूप बघून मी तिथून परत फिरलो. त्यानंतर अनेकदा पुण्याला गेलो असेल. पण शनिवार वाड्याकडे कधीही फिरकलेलो नाही. जी अवस्था शनिवारवाड्याची आहे, तीच अवस्था इतर सर्व गडकिल्ल्यांची आहे. गड किल्ल्यांकडे दुर्लक्ष केले जाते आणि गडाखाली असलेल्या अफजलखानाच्या स्मारकाला विशेष महत्त्व दिले जाते. काँग्रेसच्या काळात हीच नीती कायम अवलंबली गेली. त्यामुळेच असे प्रकार घडत आहेत. त्याच वेळी कोणी खरा इतिहास समोर आणायचा प्रयत्न केला तर ही काँग्रेसी आणि डावी मंडळी त्यांच्यावर तुटून पडत होती आणि आजही तुटून पडतात. शिक्षणाचे आणि इतिहासाचे भगवीकरण केले जात असल्याचा कांगावा करतात. त्यासाठी मग राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही बदनाम करतात. बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिला. मात्र त्यांनी दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामींना मोठे केले म्हणून बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊ नये अशी मागणी करणारे आणि त्याला विरोध करणारे हे काँग्रेसीच होते. अशाच विघ्नसंतोषी लोकांमुळे खरा इतिहास लोकांसमोर आला नाही. आणि मग असा वैचारिक गोंधळ वाढत राहिला. शिवाजी महाराजांना मुलुखचंद हवेलीत ठेवले होते की कुठे मीना बाजार हवेलीत, की किल्ल्यातच कैदेत होते यावर अजूनही वाद सुरूच आहे. 

जो वाद ऐतिहासिक पुरुषांबाबत आहे तोच वाद आपल्या देशातील पौराणिक आणि धार्मिक स्थळांबाबतही आहे. काही वर्षांपूर्वी अयोध्येत राम मंदिर होण्याआधी तेथे बौद्ध विहार होता, तसेच तिरुपती येथे जे बालाजीचे मंदिर आहे तेथेही आधी बौद्ध विहार होता असा जावईशोध काही विद्वानांनी लावला होता. सध्या प्रयाग येथे महाकुंभ गाजतो आहे. हा महाकुंभ देखील बादशहा अकबराने सुरू केला होता असा तर्क करणारी माहिती नाशिकच्या टकले नामक विद्वानाने एका व्हिडिओ क्लिप द्वारे दिली होती. एकूणच भारतीयांची श्रद्धा स्थळे कायम वादग्रस्त कशी ठरवता येतील आणि लोकांची श्रद्धा त्यावरून कशी उडेल याच दृष्टीने या ढाव्या मंडळींचे प्रयत्न राहिलेले आहेत.

यावर उपाय काय असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. माझ्या मते यावर उपाय एकच आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी आपापल्या क्षेत्रातील स्मारके आणि त्यांच्याशी संबंधित इतिहास याचा शास्त्रशुद्ध अभ्यास तज्ज्ञांमार्फत करून नेमका इतिहास दस्तावेज स्वरूपात कायम जतन करावा, आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत तो कसा जाईल याची व्यवस्था करावी. त्याचवेळी इंग्रज आणि मोगल यांच्या दबावाखाली असलेल्या या कथित पुरोगामी मंडळींनाही त्यांची जागा समाजानेच दाखवावी. तरच आपल्या पूर्वजांचा खरा इतिहास लोकांसमोर येईल आणि त्यांच्या कर्तृत्वाला आपण कायम कोटी कोटी प्रणाम करून प्रेरणा घेत राहू. 

वाचकहो पटतेय का तुम्हाला हे....?
 त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो...
close