shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अभिषेकच्या वादळी खेळाने इंग्लंडची फरपट


                भारताने पाचव्या आणि शेवटच्या टी२० सामन्यात इंग्लंडचा दिडशे धावांच्या फरकाने पराभव करून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला.  यापूर्वी टीम इंडियाने २०२३ मध्ये  न्युझिलंडचा १६८ धावांनी पराभव केला होता.  रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात अभिषेक शर्माच्या आक्रमक शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २० षटकात ९ गडी गमावून २४७ धावा केल्या.  प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १०.३ षटकांत केवळ ९७ धावा करू शकला आणि सर्वबाद झाला.  अशाप्रकारे सूर्यकुमार यादवच्या संघाने इंग्लंडचा पराभव करत मालिका ४-१ अशी जिंकली.

                भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लिश संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.  डावाच्या तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बेन डकेटला मोहम्मद शमीने त्याचा बळी बनवले.  तो खाते न उघडताच  परतला.  या सामन्यात फिल सॉल्टशिवाय कोणताही फलंदाज इंग्लंडसाठी फार काळ टिकू शकला नाही.  त्याने अवघ्या २२ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.  ५५ धावांची खेळी खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला तर नऊ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.  भारताकडून मोहम्मद शमीने तीन तर वरुण चक्रवर्ती, शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.  त्याचवेळी रवी बिश्नोईला एक यश मिळाले. 

                नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली होती.  संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून संघाचे इरादे स्पष्ट केले होते.  मात्र तो विकेटवर जास्त वेळ टिकू शकला नाही आणि १६ धावा करून बाद झाला. यानंतर अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी मोर्चा ताब्यात घेतला.  या दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ४३ चेंडूत ११५ धावांची भागीदारी झाली, ती बायडन कार्सने तोडली.  त्याने तिलाकला आपला बळी बनवले.  तो २४ धावा करून परतला.  या सामन्यात डावखुरा फलंदाज अभिषेक शर्माने वन मॅन शो दाखवत ५४ चेंडूत १३५ धावा केल्या.  या काळात त्याच्या बॅटमधून सात चौकार आणि तेरा षटकार आले.  त्यांच्याशिवाय सूर्यकुमार यादवने दोन, शिवम दुबेने ३० धावा, हार्दिक पंड्याने नऊ धावा, रिंकू सिंगने नऊ धावा, अक्षर पटेलने १५ धावा केल्या.  त्याचवेळी रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमी नाबाद यांना खातेही उघडता आले नाही.  इंग्लंडतर्फे ब्रायडन कारसेने तीन आणि मार्क वुडने दोन बळी घेतले.  याशिवाय आर्चर, ओव्हरटन आणि आदिल रशीद यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

                अभिषेकच्या स्फोटक खेळीच्या बळावर भारतीय संघाने अवघ्या ६.३  षटकांत शंभर धावा पूर्ण केल्या, ज्या कोणत्याही टी२० सामन्यात कमी चेंडूत पूर्ण केलेल्या शंभर धावा आहेत.  याआधी भारताने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हैदराबादमध्ये बांगलादेश विरुद्ध ७.१ षटकात १०० धावा पूर्ण केल्या होत्या.  त्याचवेळी, इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी२० सामन्यात भारताने पहिल्या सहा षटकांत एक बाद ९५ धावा केल्या, जी टी२० मधील पॉवरप्लेमधील भारताची सर्वोच्च धावसंख्या आहे.  भारतानेने यापूर्वी सन २०२१ मध्ये स्कॉटलंडविरुद्ध पॉवरप्लेमध्ये दोन गडी बाद ८२ धावा केल्या होत्या, ही या कालावधीतील भारताची सर्वोच्च धावसंख्या होती, परंतु अभिषेकच्या या शानदार खेळीने मागील सर्व विक्रम मोडीत काढले.

                 भारतीय संघाचा सलामीवीर अभिषेक शर्माने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दमदार कामगिरी करत अवघ्या ३७ चेंडूत शतक झळकविले.  अभिषेकने तत्पूर्वी १७ चेंडूत अर्धशतक ठोकले आणि टी२० . आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणारा तो दुसरा फलंदाज ठरला, परंतु त्याने ही लय कायम ठेवली आणि पुढील ५० धावा पूर्ण करण्यासाठी २० चेंडू घेतले.  अशाप्रकारे या फॉरमॅटमध्ये सर्वात जलद शतक झळकविणारा अभिषेक हा रोहित शर्मानंतर भारताचा दुसरा फलंदाज ठरला. त्याच्या दमदार खेळीच्या बळावर, अभिषेक भारतासाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकविणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.  अभिषेकने ३७ चेंडूत शतक झळकविले आणि संजू सॅमसनला मागे टाकून भारतासाठी सर्वात वेगवान टी२० शतक ठोकणारा दुसरा फलंदाज ठरला.  सॅमसनने गेल्या वर्षी बांगलादेशविरुद्ध ४० चेंडूत शतक ठोकले होते, मात्र आता अभिषेकने त्याला मागे टाकले आहे.  टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वात जलद शतक झळकविण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे,  त्याने २०१७ मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध ३५ चेंडूत ही खेळी साकारली होती.

                 याआधी इंग्लंडविरुद्धच्या या मालिकेतील पहिल्या सामन्यात अभिषेकने अर्धशतक ठोकून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.  मात्र, यानंतर पुढच्या तीन सामन्यांत त्याने फलंदाजी केली नाही, तर अभिषेक वानखेडेवर वेगळ्याच लयीत दिसला.  अभिषेकने संघाच्या १०.१ षटकात आपले शतक पूर्ण केले, जे आंतरराष्ट्रीय टी२० मधील कोणत्याही खेळाडूचे सर्वात कमी षटकात शतक आहे.  यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकच्या नावावर होता, त्याने  मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १०.२ षटकात शतक पूर्ण केले होते.

                 आयसीसीच्या पूर्णवेळ सदस्य देशांमध्ये सर्वात जलद शतक ठोकणारा अभिषेक तिसरा फलंदाज ठरला आहे.  या बाबतीत, त्याने जॉन्सन चार्ल्सला मागे सोडले, त्याने २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३९ चेंडूत शतक झळकविले होते.  पूर्णवेळ देशांमध्ये सर्वात जलद टी२० आंतरराष्ट्रीय शतक झळकविण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या नावावर आहे, त्यानेने २०१७ मध्ये बांगलादेशविरुद्ध ३५ चेंडूत शतक झळकविले होते.  त्याच वेळी, रोहित या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे, त्यानेही ३५ चेंडूंवर शतक झळकविले आहे. 

                  अभिषेक शर्माने मुंबईच्या वानखेडेवर प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला. जगभरातील नामवंत हस्तींच्या उपस्थितीत भारताने एक ऐतिहासिक विजय मिळविला. तसं बघाल तर चौथ्या सामन्याअखेर मालिका भारताने खिशात घातल्याने या सामन्याला फारसे महत्व नव्हते. मात्र अभिषेकच्या बॅट व बॉलच्या करामतीने व भारताच्या इतर गोलंदाजांनी केलेल्या कमालीच्या सुंदर गोलंदाजीमुळे इंग्लंडला सगळे खेळाडू मिळून शंभरीही गाठता आली नाही. एका अर्थाने  या सामन्यात एकटया अभिषेकने इंग्लंडला ३८ धावांनी तर भारताने १५० धावांनी हरविलं असं म्हंटलं तर वावगं ठरू नये.

लेखक : - 
डॉ.दत्ता विघावे                        
क्रिकेट समिक्षक 
मो. क्रं - ९०९६३७२०८२
close