भारताने इंग्लंडचा चार गडी राखून पराभव करत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. यापूर्वी टीम इंडियाने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत इंग्लंडला ४-१ ने पराभूत करून मालिका जिंकली होती. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, नागपूर येथे गुरुवारी झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ४७.४ षटकात २४८ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ३८.४ षटकांत सहा गडी गमावत २५१ धावा केल्या आणि सामना जिंकला. एकदिवसीय विश्वचषक २०२३ नंतर प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने आठ पैकी सात एकदिवसीय सामने गमावले आहेत. आता टीम इंडिया दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून अजेय आघाडी घेण्याकडे लक्ष देईल. हा सामना ९ फेब्रुवारीला कटक येथे खेळवला जाणार आहे.
विजयासाठीच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पदार्पणवीर यशस्वी जयस्वाल (१५) आणि रोहित शर्मा (०२) संघाच्या केवळ १९ धावा असतानाच बाद झाले. यानंतर शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी डावाची धुरा स्विकारली. दोघांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी ६४ चेंडूत ९४ धावांची भागीदारी झाली. यादरम्यान उजव्या हाताचा फलंदाज श्रेयसने एकदिवसीय कारकिर्दीतील १९ वे अर्धशतक झळकावले. यासाठी त्याने ३० चेंडू खेळले. वनडेमधील त्याच्या बॅटमधून आलेले हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी त्याने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध २८ चेंडूत अर्धशतक झळकविले होते.
सोळाव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जेकब बेथेलने ३० वर्षीय श्रेयसला पायचित केले. अय्यरने ३६ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५९ धावा केल्या. यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अक्षर पटेलने शुभमन गिलला साथ दिली आणि चौथ्या विकेटसाठी दोघांमध्ये शंभरहून अधिक धावांची मोठी भागीदारी झाली, ती ३४ व्या षटकात आदिल रशीदने तोडली. त्याने डावखुरा फलंदाज अक्षर पटेलला गोलंदाजी केली. तो ४७ चेंडूत ५२ धावा करून परतला. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक ४६ चेंडूत पूर्ण केले.
सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या केएल राहुलला केवळ दोन धावा करता आल्या. शुभमन गिल ८७ धावांची दमदार खेळू खेळून बाद झाला. त्याने आपल्या कारकिर्दीतील १४ वे अर्धशतक ६० चेंडूत पूर्ण केले. यादरम्यान त्याने सात चौकार मारले. हार्दिक पांड्या नाबाद ९आणि रवींद्र जडेजा नाबाद १२ धावा करत संघाला विजय मिळवून परतले. इंग्लंडकडून साकिब महमूद आणि आदिल रशीद यांनी प्रत्येकी दोन तर जोफ्रा आर्चर आणि जेकब बेथेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
नवोदित वेगवान गोलंदाज हर्षित राणा आणि फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाच्या चमकदार कामगिरीमुळे भारताने इंग्लंडला २४८ धावांत गुंडाळले. इंग्लंडकडून कर्णधार जोस बटलर आणि जेकब बेथेल यांनी अर्धशतके झळकावली, ज्यामुळे ते आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरला. भारताकडून हर्षित आणि जडेजाने प्रत्येकी तीन, तर मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
फिल सॉल्ट आणि बेन डकेट यांनी पहिल्या विकेटसाठी ७५ धावा जोडून संघाला चांगली सुरुवात करून दिली. सॉल्ट धावबाद झाल्यानंतर इंग्लंडचा डाव गडगडला आणि हर्षितने भारतीय संघात पुनरागमन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. यानंतर बटलरने संयमी फलंदाजी करत इंग्लंडच्या डावाचा ताबा घेतला, पण तो बाद झाल्यानंतर संघ पुन्हा डळमळीत झाला. मात्र, बेथेलने तग धरून अर्धशतक केले. पण बेथेल बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत आणि संघाला पूर्ण पन्नास षटकेही खेळता आली नाहीत. इंग्लंडकडून बटलरने ५२ धावा, बेथेलने ५१ धावा, सॉल्ट ४३ व डकेटने ३२ धावा केल्या, पण इतर फलंदाज काही विशेष करू शकले नाहीत.
नागपूर एकदिवसीय सामन्यात दोन खेळाडूंनी भारतीय संघासाठी पदार्पण केले. यामध्ये यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. मात्र, हर्षितसाठी पदार्पण एखाद्या 'फिल्मी' कथेसारखे होते. पहिल्याच षटकात त्याने ११ धावा दिल्या. दुसरे षटक निर्धाव राहिले असले तरी तिसऱ्या षटकात फिल सॉल्टने हर्षितचा फज्जा उडविला. या षटकात सॉल्टने २६ धावा ठोकल्या. त्यात तीन घणाघाती षटकार व दोन कलात्मक चौकार सामील होते. भारतासाठी वनडे पदार्पणाच्या सामन्यात कोणत्याही गोलंदाजाने एका षटकात दिलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यानंतर रोहितने त्याला गोलंदाजीच्या मोर्चावरून हटविले. दुसऱ्या बाजूने दोन बळी गेल्यानंतर कर्णधार रोहितने हर्षितला पुन्हा पाचारण केले, मात्र त्यानंतर त्याने जबरदस्त पुनरागमन करत इंग्लंडची मधली फळी उद्ध्वस्त केली.
पाच षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या एकही विकेट न गमावता २६ धावा होती. यानंतर हर्षितच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर फिल सॉल्टने यष्टिरक्षकाच्यावरून षटकार खेचला. यानंतर सॉल्टने दुसऱ्या चेंडूवर कव्हर्समध्ये चौकार मारला. तिसऱ्या चेंडूवर सॉल्टने बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार मारला. चौथ्या चेंडूवर सॉल्टने मिड-विकेटच्या दिशेने चौकार मारला. पाचव्या चेंडूवर एकही धाव झाली नाही आणि शेवटच्या चेंडूवर सॉल्टने मिड-विकेटवर षटकार ठोकला. अशाप्रकारे सॉल्टने हर्षितच्या एका षटकात २६ धावा दिल्या. सहा षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या एकही विकेट न गमावता ५२ धावा अशी होती.
मात्र, सॉल्ट जास्त काळ टिकू शकला नाही आणि नवव्या षटकात धावबाद झाला. त्याने २६ चेंडूंत पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने ४३ धावा केल्या. हर्षित पुन्हा गोलंदाजीला आला आणि त्याने दहाव्या षटकात चार चेंडूत दोन बळी घेतले. अशाप्रकारे हा सामना हर्षितसाठी रोलर कोस्टर राईड ठरला आहे. [रोलर कोस्टर राईड म्हणजे एक थरारक पाळणा, जिथे प्रवाशांना वेग आणि दिशेतील अचानक बदल अनुभवता येतो. ]
दहाव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हर्षितने बेन डकेटला यशस्ववीकडे झेलबाद केले. डकेटने २९ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने ३२ धावांची खेळी खेळली. त्यानंतर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर हॅरी ब्रूकला यष्टिरक्षक राहुलने झेलबाद केले. ब्रूक खाते उघडू शकला नाही. दहा षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ७७ धावा होती. यानंतर हर्षितने आणखी एक विकेट घेतली. त्याने लियाम लिव्हिंगस्टोनला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. लिव्हिंगस्टोनला पाच धावा करता आल्या. हर्षितने सात षटकांत ५३ धावा दिल्या आणि तीन बळी घेतले. मोहम्मद शमीने हर्षितला पदार्पणाची कॅप दिली.
भारताने विजयी सलामी दिली असली तरी भारताचे दोन्ही सलामीवीर यशस्वी व कर्णधार रोहित अपयशी ठरले. यशस्वी त्याचा पहिलाच सामना खेळत असल्याने त्याच्या विषयी चिंतेची बाब एवढी नाही. परंतु अपयश रोहित शर्माचा पिच्छा सोडायलाच तयार नाही. हि भारतासाठी आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विचार करता चिंतेची बाब आहे. कारण चॅम्पियन्स ट्रॉफीत रोहितच भारतचं नेतृत्व करणार आहे. तिथेही असेच राहिले तर भारतासाठी त्रासदायक ठरू शकते. सततच्या येत असलेल्या अपयशातून रोहित काहीच शिकत नसल्याचे सकृतदर्शनी तरी दिसत आहे. त्याचा मागील अनेक सामन्यात चांगला परफॉर्मस होत नसल्याने त्याच्यावर टिका होते, त्याला निवृत्तीचे सल्ले दिले जातात. हे त्याला आवडत नाही. या विषयी तो माजी क्रिकेटपटूंबद्दल बीसीसीआयकडे तक्रार करतो. मग स्वतःचा खेळात सुधारणा करणे त्याला का जमत नाही ? स्वतःच्या चुका दाखवणाऱ्यांकडे बोट दाखविण्यापेक्षा बॅटने बोलणेच रोहितसाठी उचित ठरेल. अन्यथा भारताची बेंच स्ट्रेंग्थ किती मजबूत आहे हे त्याला चांगलेच ठाऊक आहे. एवढं समजूनही तो काही शिकला नाही तर त्याची उचलबांगडी अटळ आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२