पाकिस्तानमधील वनडे तिरंगी मालिकेमधील दुसरा सामना सोमवारी दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेने २६ वर्षीय फलंदाज मॅथ्यू ब्रित्झकेला पदार्पणाची संधी दिली. सलामीवीर म्हणून मैदानात उतरल्यानंतर ब्रित्झकेने पहिल्याच सामन्यात संस्मरणीय शतक झळकविले आणि विश्वविक्रम रचला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर त्याने १४८ चेंडूत अकरा चौकार आणि पाच षटकारांसह दिडशे धावा केल्या. वनडे पदार्पणात १५० धावा करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटच्या ५३ वर्षांच्या इतिहासात ब्रित्झके व्यतिरिक्त कोणालाही ही कामगिरी करता आलेली नाही.
ब्रित्झकेने वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज डेसमंड हेन्सचा विक्रम मोडला आहे. हेन्सने सन १९७८ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे पदार्पणात १३६ चेंडूत १४८ धावा केल्या होत्या. त्याने १६ चौकार आणि २ षटकार मारले होते. वनडे पदार्पणात सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अफगाणिस्तानचा रहमानउल्ला गुरबाज तिसऱ्या क्रमांकावर आहे. आयर्लंडविरुद्धच्या वनडे सामन्यात त्याने १२७ चेंडूत ८ चौकार आणि ९ षटकारांच्या मदतीने १२७ धावा केल्या. या यादीत त्याच्यानंतर न्युझीलंडचा मार्क चॅपमन (१२४), इंग्लंडचा कॉलिन इंग्राम ( १२४) आणि न्युझिलंडचा मार्टिन गप्टिल (नाबाद १२२) या खेळाडूंची नावे आहेत.
या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, ब्रित्झकेच्या ऐतिहासिक खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने निर्धारित ५० षटकात सहा बाद ३०४ धावा केल्या. ब्रित्झकेने कर्णधार टेंबा बावुमा (२०) सोबत पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. नंतर त्याने जेसन स्मिथ (४१) सोबत ९३ धावा जोडल्या. ब्रित्झकेने विआन मुल्डर (६४) सोबत चौथ्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. ब्रित्झके ४६ व्या षटकात मॅट हेन्रीचा बळी ठरला. त्याने मायकेल ब्रेसवेलकडे झेल दिला. काइल व्हेरे (१) आणि सेनुरान मुथुसामी (७) दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. न्यूझीलंडकडून हेन्री आणि विल्यम ओरुकने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
चॅम्पियन्स ट्रॉफीचा सराव म्हणून आयोजित केलेल्या छोटेखानी वनडे तिरंगी मालिकेत न्यूझीलंडची विजयी मालिका सुरूच आहे. पहिल्या सामन्यात यजमान पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर न्यूझीलंडने सोमवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६ गडी राखून विजय नोंदविला. १४ फेब्रुवारीला होणाऱ्या तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडने प्रवेश केला आहे. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेने 305 धावांचे लक्ष्य ठेवले होते, ज्याचा पाठलाग न्यूझीलंडने ४८.४ षटकांत चार गडी राखून पूर्ण केला. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज केन विल्यमसनने शानदार शतक झळकावून दक्षिण आफ्रिकेचा पराभव करण्यात मोठा हातभार लावला. त्याने ११३ चेंडूंत १३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद १३३ धावा केल्या. हे त्याचे एकदिवसीय कारकिर्दीतील चौदावे शतक आहे.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात चांगली झाली. डेव्हॉन कॉनवेने विल यंगसोबत ५० धावांची भागीदारी केली. यंग दहाव्या षटकात ३१ चेंडूत १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याला इथन बॉशने बाद केले. यानंतर कॉनवे आणि विल्यमसन यांनी चांगली आघाडी घेतली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८७ धावांची भागीदारी केली. केनने ७२ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि वनडेतील शतकाचा दुष्काळ संपवला.
केन विल्यमसनने २०६० दिवसांनंतर वनडे प्रारूपात शतक ठोकले आहे. त्याने यापूर्वी २२ जून २०१९ रोजी एकदिवसीय शतक झळकविले होते. कॉनवेही आपले शतक पूर्ण करेल असे वाटत होते पण तो तीन धावांनी हुकला. त्याने १०७ चेंडूत ९७ धावा केल्या, ज्यात ९ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
कॉनवेने ३६ व्या षटकात २३७ धावांवर आपली विकेट गमावली. तो ज्युनियर डालाचा बळी ठरला. डॅरिल मिशेलने १० धावांचे योगदान दिले तर यष्टीरक्षक टॉम लॅथम बाद झाला. सेनुरान मुथुसामीने ३९ व्या षटकात दोघांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, विल्यमसन एका टोकावर ठाम राहिला. त्याने ग्लेन फिलिप्स (३२ चेंडूत नाबाद २८) सोबत न्यूझीलंडला विजय मिळवून दिला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची अखंड भागीदारी केली. विल्यमसनने विजयी चौकार ठोकले. त्याचवेळी नाणेफेक गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने निर्धारित ५० षटकांत ६ बाद ३०६ धावा केल्या. द. आफ्रिकेचा पदार्पणवीर सलामीचा फलंदाज मॅथ्यू ब्रिट्झकेने सामन्यात सर्वाधिक धावा केल्या.
पाकिस्तान - न्युझीलंड -द. आफ्रिका हे तिन संघ या स्पर्धेत सहभागी असून प्रत्येकाला एकमेकांशी एकेकदा झुंजायचे असून गुणतालिकेत आघाडीवर असलेले दोन संघ १४ फेब्रुवारीला अंतिम फेरीत करंडकासाठी लढतील. तूर्त तरी न्युझीलंडने फायनलचे तिकीट बुक केले असून पाक व आफ्रिकेने आपले पहिले सामने न्युझीलंडविरूध्द गमावल्याने त्यांच्यातील सामन्याला उपांत्य फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यांच्यातील विजेता संघ फायनलमध्ये न्युझीलंडशी खेळण्याचे तिकीट मिळविण्यासाठी बुधवारी आपसात भिडणार आहे. पाक व आफ्रिकेच्या संघावर व त्यांच्या सद्य कामगिरीवर नजर टाकली तर पाकिस्तानचे अंतिम फेरीत पोहोचणे कठीण दिसते.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक
मो. क्रं - ९०९६३७२०८२