पशुविज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम उद्या परळीत येऊन करणार जागेची पाहणी!!!
प्रकाश मुंडे/ बीड जिल्हा प्रतिनिधी :-
राज्याच्या पर्यावरण व वातारणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी परळीत शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचे आदेश पशुसंवर्धन विभागाला दिले आहेत. महाविद्यालयांसाठी लागणाऱ्या जागेची पाहणी करण्यासाठी पशू विज्ञान विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम उद्या परळीत दाखल होत आहे, लवकरच या कामाला गती येणार आहे.
राज्यात परळी वैजनाथ आणि बारामती या दोन ठिकाणी नवीन शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा ना. पंकजाताई मुंडे व उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात करण्यात आली होती. त्या अनुषंगाने या दोन्ही ठिकाणी महाविद्यालय स्थापन करण्याकरिता मुलभूत सोयीसुविधांचे निरीक्षण व भारतीय पशू चिकित्सा परिषद नवी दिल्ली यांचे मानकानुसार आवश्यक असलेल्या बाबींच्या अनुषंगाने विद्यापीठ स्तरिय निरीक्षण समिती गठीत करण्यात आली असून या समितीचे अध्यक्ष तथा पशू विज्ञान विद्यापीठाचे डीन डाॅ. एस व्ही. उपाध्ये, डाॅ. जी. एस. खांडेकर, कनिष्ठ अभियंता डाॅ. पी.व्ही. तायडे, तांत्रिक अधिकारी डाॅ पी. इ. ताकसांडे हे उद्या जागेची पाहणी करण्यासाठी येणार आहेत.
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक तसेच सर्व संबधित अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.
ना. पंकजाताईंनी घेतला आढावा
---------
शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ना. पंकजाताई मुंडे यांनी पर्यावरणा सोबतच परळीत होणाऱ्या नवीन शासकीय पशू वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेचा आढावा घेतला होता. अधिकाऱ्यांच्या टीम कडून जागेचा निर्णय घेतला येणार आहे, त्यानुसार उद्याची पाहणी होत आहे.